वल्गनीच्या चिवणी माशांची मासेमारी जोरात
उरण ः दडी मारलेल्या पावसाने आता दमदार सुरुवात केल्याने उरण तालुवयातील खाडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात चिवणी माशांची मासेमारी सुरु झाली आहे. उरण पूर्व भागात झालेल्या भरावांमुळे या भागातील खाडी किनाऱ्यांचे पाण्याचे मार्ग बंद झाल्यामुळे या वर्षी पावसाळ्यात वल्गनीचे (उधवणीची) चिवणी मासे मिळण्याचे प्रमाण घटले असले तरी पाऊस चांगला झाल्यामुळे नदी, नाले वाहू लागल्याने चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. परंतु, यावर्षी उरण पूर्व भागात मोठ्या प्रमाणात उद्योगांसाठी भरावांची कामे झाल्याने यावर्षी चिवणी मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
पावसाळा सुरु झाल्यावर उरण तालुक्याच्या पूर्व भागात चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळत असत. सुरुवातीच्या पावसात चिवणी मासे समुद्रातून अंडी सोडण्यासाठी या भागातील गोड्या पाण्याची नदी, नाले, शेतीत येतात. मात्र, या भागात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जमिनी संपादित झाल्याने तसेच त्या जमिनींवर भराव करताना भांडवलदारांनी नाल्यांचे आणि नैसर्गिक पाणी वहिवाटीचे मार्ग बंद केल्याने यावर्षी चिवणी माशांची आवक कमी झाली आहे. यावर्षी उशिरा पाऊस झाल्याने मत्स्य खव्वयांना चिवणी मासे मिळण्यास थोडा विलंब झाला. आता मासळी बाजारात चिवणी माशांची आवक देखील वाढली आहे. ग्राहक देखील या माशांवर तुटून पडत आहेत. गेल्या वर्षी १० चिवणी माशांचा वाटा शंभर रुपयाला मिळत होता. मात्र, यावर्षी शंभर रुपयाला ४ ते ५ चिवणी मासे मिळत आहेत.
एकेकाळी उरण तालुका मासळीचे आगार म्हणून ओळखला जात होता. मात्र, जेएनपीटी बंदर आणि त्याच्या अनुषंगाने आलेले उद्योगधंदे यामुळे या भागात मासळी मिळण्याचे प्रमाण फार कमी झालेले आहे. उरण पश्चिम भागातील अरबी समुद्रालगतच्या महालण विभागातील जमिनी या अगोदरच संपादित झाल्या आहेत. तर उरण पूर्व भागातील खोपटा, कोप्रोली, बोरखार, धुतूम, चिर्ले, वेश्वी, दादरपाडा, मोठीजूई, या मासळी मिळण्याच्या ठिकाणांवर (खाजण क्षेत्रावर) मोठ्या प्रमाणात भराव झाल्याने या भागातील मासळीचे क्षेत्र घटले आहे.