पहिल्याच पावसात एमआयडीसी मधील रस्ते जलमय
वाशी ः नवी मुंबई महापालिका तर्फे दरवर्षी नवी मुंबई शहरातील पावसाळापूर्व नालेसफाई १०० टवके केल्याचा दावा केला जातो. मात्र, १ जुलै रोजी पडलेल्या पहिल्याच पावसात महापालिकेचा दावा पावसाने फोल ठरवत नालेसफाईची पोलखोल केली आहे. महापालिकेने योग्य रीतीने नालेसफाई न केल्याने एमआयडीसी भागातील रस्ते पाण्याखाली गेले. तर रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर देखील परिमाण झाला.
पावसाळयात नवी मुंबई शहरात पाणी साचू नये म्हणून नवी मुंबई महापालिका द्वारे दरवर्षी पावसाळापूर्व नालेसफाई केली जाते. यात बंदिस्त गटारांसहित नैसर्गिक नाल्यांचा समावेश आहे. नवी मुंबई शहरात एकूण ७७ नैसर्गिक नाले असून, सदर नाले एमआयडीसी भागातील डोंगरातून उगम पावतात. नाले साफ करण्याचे ठेके महापालिका देते. दरवर्षी नवी मुंबई महापालिका आयुक्त पाहणी दौरे आयोजित करुन पावसाळापूर्व नालेसफाईचा आढावा घेतात. तसेच नाले योग्य रीतीने साफ करण्याबाबत निर्देश देतात. दरवर्षी नवी मुंबई महापालिका अधिकारी नालेसफाई १०० टक्के पूर्ण केल्याचा दावा करतात. मात्र, महापालिकेचा नालेसफाईचा दावा प्रत्येक वेळी पाऊस फोल ठरवत आला आहे. यंदा देखील तीच परिस्थिती आहे. यावर्षी १ जुलै रोजी पडलेल्या पहिल्याच पावसात महापालिका अधिकाऱ्यांनी केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. एमआयडीसी भागातील नालेसफाई योग्य पध्दतीने न केल्याने दिघा, रबाळे भागातील रस्ते १ जुलै रोजी पडलेल्या पावसात पाण्याखाली गेले होते. दुसरीकडे दिघा, रबाळे भागातील रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर देखील परिमाण झाला होता.
दरम्यान, दिघा, रबाळे भागातील रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा नवी मुंबई महापालिका आणि एमआयडीसी कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात आला, अशी माहिती ‘एमआयडीसी'चे उप अभियंता शशिकांत गीत्ते यांनी दिली.