कचरावेचक महिलांची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न
कचरावेचक महिलांच्या शैक्षणिक गुणवत्ताधारक मुलांचा गौरव
नवी मुंबई ः जन्म दाखला नसणे ते इंजिनियर होऊन एका महाविद्यालयात प्राध्यापक होणे हा कचरावेचक महिलेच्या मुलाच्या शिक्षणाचा प्रवास हे विकासाच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल असून कचरावेचक महिलांच्या मुलांनी डम्पिंगवर न जाता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी स्त्री मुक्ती संघटनेने केलेल्या दोन दशकाच्या अथक प्रयत्नाचे हे फळ आहे, असे उद्गार स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त वृषाली मगदूम यांनी काढले. यावर्षी दहावीच्या परीक्षेत २५ व बारावीच्या परीक्षेला बसलेले २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात एका कचरावेचक भगिनीचाही समावेश आहे. त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
बावीस वर्षाच्या खंडानंतर घरी अभ्यास करून मंगला खरात परीक्षेला बसून पास झाली आहे. संगीता शेळके या कचरावेचक भगिनीची मुलगी भाग्यश्री शेळके ही दहावीत ९० टक्के मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली आहे. या विद्यार्थासाठी दिप अर्चन धर्मादाय न्यासचे संदीप नेमलेकर व मिलिंद आचार्य यांनी व्यवसाय मार्गदर्शन हे सत्र घ्ोताना व्यवसायामध्ये असणारे विविध पर्याय सांगत हे व्यवसाय निवडून पुढे जाऊन काय संधी उपलब्ध होऊ शकतात याविषयी सविस्तर माहिती दिली. अनिल मखमले यांनीही एसपी मोरे कॉलेजमध्ये गरीब व गरजू मुलांसाठी सवलतीत उपलब्ध असलेल्या कोर्सेसची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा किसवे हिने केले. श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून परिसर भगिनींच्या मुलांसाठी १६ ऑगस्ट २०२१ पासून मोफत संगणक वर्ग चालवले जात असून परिसर भगिनींसाठी मोफत शिलाई मशीन वर्गही चालवला जातो. श्रीराम राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त राधाकृष्णन व ललिता राधाकृष्णन, वृषाली मगदूम यांनी या विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी त्यांना सर्टिफिकेट वाटपही केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राधाकृष्णन व ललिता मॅडमनी विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधीचा फायदा घ्ोत स्वतःमधील कौशल्य वाढवत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या कोर्सचा उपयोग करून घ्ोतला पाहिजे असे सांगितले. संगणकाची व शिलाई वर्गाची फी भरणे परवडत नसल्याने या महत्त्वाच्या शिक्षणापासून वंचित झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे असे वृषाली मगदूम यांनी सांगितले. संगणक मध्ये ९० विद्यार्थ्यांनी व शिलाई मशीन मध्ये १२० महिलांनी हा कोर्स पूर्ण केला आहे. विद्यार्थी व महिलांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना पंधरा हजार फी भरून त्यांचे मित्र जे शिकू शकले नाहीत ते ज्ञान त्यांना इथे मिळाल्याचे सांगितले.