उरण बाजारात रानभाज्या बाजारात दाखल
पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्या स्वस्त, औषधी असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष
उरण ः वर्षातून एकदा तरी रानभाजी खाण्याची खेडेगावातील परंपरा आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागांमध्येही रानभाज्यांना मागणी असते. रानभाज्या फवत एक ते दोन महिने जंगलात उगवतात. पाऊस जसजसा वाढत जाईल, तसतशा विविध रानभाज्या रानात मिळणार आहेत. बांधावरील रानभाज्या गायब झाल्या आहेत. त्यामुळे रानभाज्यांसाठी आदिवासी महिलांना वणवण करावी लागत आहे. सध्या उरण बाजारपेठेत अंबाडी, कुलू, भारंगी, टाकळा, अळू, शेवळा आदी रानभाज्या दाखल झाल्या आहेत
पावसाळ्यात उगवणाऱ्या रानभाज्या स्वस्त, औषधी असूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. रानभाज्यांबद्दल नसलेली माहिती, करण्याच्या निराळ्या पध्दती, यामुळे रानभाज्यांची विक्री अतिशय कमी होते. परिणामी स्वस्त असूनही रानभाज्यांना सामान्यांच्या ताटात स्थान मिळत नाही. मात्र, आता सर्वसामान्यांना पावसाळी भाज्यांचा पर्याय उपलब्ध होऊ लागला आहे.
सध्या उरण शहरातील आनंद नगर, उरण राजपाल नाका, महाराष्ट्र स्वीट जवळ आदी ठिकाणी आदिवासी महिला रानभाजी विकताना दिसत आहेत. सध्या उरण बाजारात अळू विक्रीसाठी आले आहेत. मात्र, मागील वर्षी १० रुपयांना मिळणारा पाच अळूचा वाटा, यावर्षी २० रुपयांना मिळत आहे.
टाकळा गुणाने उष्ण असल्याने शरीरातील वात आणि कफदोष कमी होण्यास मदत होते. वरचेवर टाकळा भाजी खाल्ल्याने अंगातील अतिरिक्त मेद झडतो. तसेच त्वचाविकार कमी होतात. लहान मुलांच्या पोटातील कृमी बाहेर पडण्यासही या भाजीचा उपयोग होतो.
ंशेवळा औषधीयुक्त भाजी आहे. शेवळाची एक जुडी ३० ते ४० रुपयांपर्यंत विकली जाते. पावसाळ्यात या भाज्या अधिक मिळतात. अंबाडी, कुलू, भारंगी, टाकला आदी भाजांची जुडी १० रुपयांना मिळते. अंबाडी आता दुर्मीळ होत असून, दिसेनाशी होत आहे. आंबट चवीची अंबाडीची भाजी चविष्ट असते. याशिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाडी मध्ये आयर्न (लोह), व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी ६, कॅल्शियम, झिक आणि अँटीऑक्सिडंट यांसारखी अनेक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
रानभाज्या या इतर भाजीपाल्याच्या तुलनेत स्वस्त असतात. रानभाज्या खायलाही पौष्टिक आणि फायदेशीर असतात. आदिवासी स्त्रिया रानावनात फिरुन रानभाज्या मिळवितात. रानभाज्या विकून आदिवासी महिलांना रोजगार मिळत असून, रानभाज्या त्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देत आहेत.