जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
अंमली पदार्थाच्या समस्येकडे समाजातील विविध घटकाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज - पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे
नवी मुंबई : अंमली पदार्थाच्या समस्येकडे फक्त पोलीसच नाही तर समाजातील विविध घटकाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच अंमली पदार्थामुळे होणारी तरुण तरुणींची वाताहत थांबेल. तसेच पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे योग्य प्रकारे लक्ष दिल्यास त्यांची मुले नशेच्या आहारी जाणार नाहीत, असे प्रतिपादन विशेष शाखेच्या पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांनी वाशीत केले.
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वाशी येथील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि वाशी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. याप्रसंगी प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर धरव शाह, गॅलेक्सी सर फॅक्टंटस् लि. चे उपाध्यक्ष आदर्श नय्यर व नशाबंदी मंडळाचे मिलिंद पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नशा मुक्त शहर रहावे यासाठी पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडुन विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगतानाच विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांना पोलिसांकडे मदतीसाठी जाण्याचा सल्ला दिला. तसेच पोलिसांकडुन नशेच्या आहारी गेलेल्यांचे समुपदेशन केले जाते, तसेच त्यांना व्यसनातुन बाहेर काढण्यासाठी मार्गदर्शन देखील केले जात असल्याचे पोलीस उपआयुक्त रुपाली अंबुरे यांनी सांगितले.
नवी मुंबई शहर नशा मुक्त करण्यासाठी जी मदत लागेल, ती मदत करण्याची तयारी आदर्श नय्यर यांनी दाखवली. तर डॉ. धरव शहा यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या मनातले विविध प्रकारचे गैरसमज, ग्रह दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सभाष कुलकर्णी यांनी आनंदवनात बनविलेले शुभवस्त्र प्रदान करुन पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ अजित मगदूम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ मृण्मयी भजक व उदय तिळवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला लव शर्मा दिग्दर्शित अत्यंत प्रभावी असे पथनाटÎ सादर करण्यात आले.
या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील भाऊराव पाटील महाविद्यालय, आयसीएल झुनझुनवाला कॉलेजचे एन एस एस चे विद्यार्थी तसेच मॉडर्न स्कूलचे विद्यार्थी गझलकार आप्पा ठाकूर, मधुकर राऊळ, पडवळ तसेच अन्वय व्यसनमुक्ती केंद्राचे अनिल लाड, आरती खेडकर, मुक्ता महापात्रा, वृषाली मगदूम ,जीवन निकम, लता कोठावळे, शितल सारंग, नयन म्हात्रे, तसेच या क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.