खाजगी बस चालकांकडून रस्त्याची अडवणूक
सायन पनवेल महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकांकडून बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
वाशी -: सायन पनवेल महामार्गावर हुंडई शोरूम समोर खाजगी ट्रॅव्हल्स बस चालकांकडून सध्या बस प्रवासी भरताना बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतूक कोंडी सोबतच अशा पार्किंगमुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली असुन अशा प्रकारे वाहन पार्क करणाऱ्या बस चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सायन पनवेल महामार्ग अत्यंत अशा वाहतुकीने गजबजलेल्या व भरधाव वेगासाठी प्रसिद्ध असलेल्या सायन पनवेल महामार्गावरून रोज हजारो प्रवासी खाजगी बसने प्रवास करीत असतात. त्यात मुंबईच्या दिशेने पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण, गोवा या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठया प्रमाणात आहे. नवी मुंबईतुन ही या मार्गावरून हजारो प्रवासी वाहतूक करीत असतात आणि ज्या खाजगी ट्रॅव्हल्स बसेस मधून प्रवासी प्रवास करताना त्या सर्व बसेस या मुंबई सोडली की नवी मुंबईतुन जातात. सध्या सानपाडा हुंडई शोरुम समोर अशा बस उभ्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मागून येणारी वाहने थांबली जाऊन वाहतूक कोंडी होते. या बेशिस्त बस पार्किंगमुळे रस्ता तर अडला जातो शिवाय अपघात ही होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या बस चालकांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.