३५० कोटी रुपये खर्चून वाशी येथील महात्मा फुले भवन ते कोपरी पर्यंत उड्डाणपूल निर्मिती
वाशी येथील महात्मा फुले भवन ते कोपरी नियोजित उड्डाणपूल प्रकल्प वृक्ष तोडीविरोधात हरकतींचा पाऊस
नवी मुंबई -: मनपाच्या माध्यमातून ३५० कोटी रुपये खर्चून वाशी येथील महात्मा फुले भवन ते कोपरी पर्यंत उड्डाण पूल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पात ३९० झाडांचा बळी जाणार असल्याने राजकीय पातळीवर याचे पडसाद उमटले, प्रचंड गाजलेल्या या वृक्ष तोडी विरोधात आता सुमारे १९०६ नागरिकांनी पुढाकार घेऊन हरकती सूचना मांडल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. त्यामुळे या हरकतींच्या सुनावणीकडे नवी मुंबई करांचे लक्ष लागले आहे.
उद्यान विभागाने या नियोजित कोपरी उड्डाणपूल साठी ३९० पैकी ३८६ झाडे प्रत्यारोपण व ४ झाडे तोडण्याची परवानगी प्रक्रिया राबवली जात आहे. यासाठी या नागरिकांनी हरकत घेतली आहे. कोपरी पाम बीच मार्गावर नियोजित उड्डाणपूल बनवण्यासाठी ही झाडे बाधित होत असल्याने उद्यान विभागाने परवानगी प्रक्रिया सुरू केली. ठाणे येथील एका स्थानिक दैनिकात याबाबत सूचना प्रकाशित करण्यात आली होती. ऐरोली येथील आमदार गणेश नाईक यांनी याविरोधात आवाज उठवला होता. या प्रक्रियेला आक्षेप घेत नाईक यांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. अखेर मनपा प्रशासनाने या प्रक्रियेला एक महिन्यांची मुदतवाढ देत राज्य स्तरीय दैनिकात याबाबत सूचना प्रकाशित केली. यानंतर सुमारे १९०७ जणांनी वृक्षतोडी विरोधात हरकती नोंदवल्या आहेत 20 जून रोजी हरकत घेण्यासाठी अखेरची तारीख होती या दरम्यान भाजपचे आमदार आशीष शेलार यांच्या उपस्थितीत गणेश नाईक,माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, संजीव नाईक यांच्या समवेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढून चिपको आंदोलन केले होते. याच आंदोलनाच्या शेजारी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने देखील आंदोलन केल्याने झाडांचा प्रश्न चांगलाच रंगला. तर ऐरोलीमध्ये स्थानिक नेते अनंत सुतार यांनी सह्यांची मोहीम राबवत आंदोलन पेटवत ठेवले. झाडांच्या बचावासाठी राजकीय पातळीवर जोरदार श्रेय बाजी रंगल्याने मनपा प्रशासनाने एक महिन्यांची मुदतवाढ दिल्यावर आता १९०७ जणांनी आपल्या हरकती उद्यान विभागाकडे नोंदवल्या आहेत. आता प्रशासन या नागरिकांची सुनावणी घेवून हा प्रस्ताव राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे पाठवून देणार आहे.राज्य वृक्ष प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर या झाडांचे भवितव्य निश्चित होणार आहे. मात्र दोन हजारच्या घरात हरकती आल्याने आता या हरकतीवर सुनावणी घेण्यासाठी प्रशासनाला तयारी करावी लागणार असून या हरकती राज्य वृक्ष प्राधिकरणाने मान्य केल्या तर वृक्ष तोडी बाबत फेर निर्णय घेण्याचा चेंडू पुन्हा स्थानिक उद्यान विभागाकडे टोलवला जावू शकतो. मात्र आता प्रक्रियेला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे हे मात्र निश्चित.
एमाआयडीसीतील वृक्ष तोडिकडे पर्यावरण प्रेमींचे दुर्लक्ष ?
महात्मा फुले भवन ते कोपरी पर्यंत उड्डाण पूल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पात ३९० झाडे वाचावी म्हणून १९०६ जणांनी मनपाकडे हरकती नोंदवल्या आहेत. मात्र दुसरीकडे याच दरम्यान एमआयडीसी मध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी २८२९ झाडांवर कुऱ्हाड पडणार आहे.मात्र त्याविरोधात अवघ्या १० जणांनी हरकती नोंदवल्या होत्या. त्यामुळे वाशीतील झाडे वाचावी म्हणून आंदोलन करणाऱ्या पर्यारणप्रेमींनी व राजकीय नेत्यांनी एम्आयडीसी वृक्ष तोडी विरोधात पूर्ती पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.