मारुती एसएक्स कारने पेट घेतल्याने कार पुर्णपणे जळुन खाक

पामबीच मार्गावर बर्निंग कार, सुदैवाने जिवीत हानी नाही 

नवी मुंबई : वाशी येथून पामबीच मार्गे उलवे येथे जाणा-या मारुती एसएक्स कारने  पेट घेतल्याने सदरची कार पुर्णपणे जळुन खाक झाल्याची घटना रविवारी रात्री 8 च्या सुमारास मोराज सर्कल येथे घडली. कार चालकाने सुदैवाने वेळीच बाहेर पळ काढल्याने तो यातून बचावला गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन कारला लागलेली आग काही वेळात विझवली. मात्र तोपर्यंत सदर कार पुर्णपणे जळाली.   

उलवे येथे राहणारा व्यावसायीक इम्रान सय्यद (36) हा रविवारी सायंकाळी कामानिमित्त वाशीमध्ये आला होता. त्यानंतर तो रात्री 8 वाजण्याच्या सुमारास आपल्या मारुती एसएक्स कारने (एमएच-43 एआर-4666) पामबीच मार्गे उलवे येथे जात होता. सदरची कार पामबीच मार्गावरील मोराज सर्कल येथील सिग्नलवर थांबल्यानंतर इम्रानच्या कारमधून धुर येत असल्याचे बाजुच्या कार चालकाने त्याला सांगितले. त्यामुळे इम्रानने तत्काळ कारमधुन बाहेर पळ काढल्यानंतर  कारने पेट घेतला. कार चालक इम्रान सय्यद याने कारमधुन वेळीच बाहेर पडल्याने तो यातुन बचावला. त्यानंतर या घटनेची माहिती मिळताच वाहतुक पोलिसांनी व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.  

अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पुर्णपणे जळुन खाक झाली. भरचौकात घडलेल्या या प्रकारामुळे पामबीच मार्गावर शेकडो वाहने अडकुन पडल्याने व त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी पामबीच मार्गावरुन जाणारे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी स्वत: रस्त्यावर उभे राहुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सानपाडा पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोलीत छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी