उपस्थित मान्यवरांकडून कै.अशोक जालनावाला त्यांच्या पत्रकारितेतील कार्यकर्तृत्वाला उजाळा
कै.अशोक जालनावाला यांना द्वितीय पुण्यतिथी दिनी मान्यवरांची आदरांजली
नवी मुंबई ः ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात दादा म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ पत्रकार स्वर्गीय अशोक जालनावाला यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त २३ रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वर सुमनांजलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहताना त्यांच्या पत्रकारितेतील कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला.
कै. अशोक जालनावाला यांनी पत्रकारिता क्षेत्रात कार्य करताना समाजातील विविध प्रश्नांना नुसती वाचा फोडली नाही, तर त्या प्रकरणांना शेवटपर्यंत तडीस नेऊन त्यांना न्याय मिळवून दिला. पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना त्यांनी सदैव निर्भिड आणि निष्कलंक पत्रकारिता केली. लोकांना अन्याया विरुध्द लढायला शिकवले, त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सचोटीने प्रयत्न केले. त्यामुळेच लोकांची त्यांच्यावरील विश्वासार्हता वाढल्याचे सुतोवाच आमदार गणेश नाईक यांनी यावेळी आदरांजली वाहताना केले.
अत्यंत गोपनीय बातमी शोधून काढणे कै. अशोक जालनावाला यांच्यातील एक उत्तम कौशल्य होते. ते नेहमी सत्य बातमी मिळवण्यासाठी वणवण फिरायचे, बातमीची सत्यता पडताळायचे आणि मगच् ती प्रसिध्दीस द्यायचे. एक्सक्लुझिव्ह बातमी देण्यासाठी त्यांची सुरु असणारी धडपड खूप जवळून पाहिलेली आहे. ते बातम्या लिहिताना कधी डगमगले नाहीत आणि कधी कोणाबद्दल पूर्वग्रह ठेवून लिहिले सुध्दा नाही. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्याबद्दल अनेकांच्या मनात एक आदरयुक्त दरारा निर्माण झाला होता, असे आ. गणेश नाईक यावेळी म्हणाले.
कै. अशोक जालनावाला यांचा प्रत्येक विषयाचा अभ्यास, विविध गोष्टी हाताळण्याची सचोटी, बातमीची विश्वासपूर्णतः, गुप्तता, जनमानसाशी असलेला वैयक्तीक संपर्क दांडगा होता. स्वभावातील करारीपणा, उत्कृष्ट देहबोली, बोलण्यातील जरब या गोष्टी इतरांपेक्षा उजव्या असल्याने प्रथमदर्शनीच समोरच्यावर त्यांची छाप पडल्याशिवाय राहत नसे, अशा भावना यावेळी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केल्या.
तर बातमीतील अनन्यपणा त्यांचे पत्रकारितेतील सर्वात मोठे बलस्थान, वैशिष्टय होते. अतिशय निर्भिड आणि निडर राहिल्यामुळे पत्रकरितेतील सर्व आव्हानांना कै. अशोक जालनावाला समर्थपणे पेलू शकले. पत्रकारितेत बातमीसाठी त्यांच्याकडे असलेली उत्तम तिक्ष्ण नजर आणि समोरच्याने न बोललेलेही ऐकू येणारे कान त्यांच्यापाशी होते, असे ‘पनवेल'चे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हेमंत जुवेकर, विकास महाडिक, नारायण जाधव, कांतीलाल कडू, जयेश सामंत, राज्याचे माहिती विभागाचे माजी संचालक देवेंद्र भुजबळ यांनी देखील कै. अशोक जालनावाला यांच्या सोबत पत्रकारिता क्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी मुंबईचा चालता-बोलता इतिहास असणाऱ्या कै. अशोक जालनावाला यांचे एखाद्या मोठ्या वास्तुला नाव दिल्यास त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे मत यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश जालनावाला यांनी तर आभार प्रदर्शन मनोज जालनावाला यांनी केले. सूत्रसंचालन महापालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी केले.
दरम्यान, उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिल्यानंतर पं. संजीव अभ्यंकर यांनी सादर केलेल्या भक्तीगीतांच्या स्वर सुमनांजलीने उपस्थित श्रोतेगण मंत्रमुग्ध झाले. याप्रसंगी ‘नवी मुंबई'चे सह-पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, उपायुक्त पुरुषोत्तम कराड, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढेले, संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, ‘सिडको'चे उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, महापालिकेचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, जयदीप पवार, माजी महापौर सुधाकर सोनवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, प्रविण पुरो यांच्यासह नवी मुंबई, ठाणे, पनवेल, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून आलेले समाजातील विविध लोकप्रतिनिधी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, स्व. अशोक जालनावाला यांचे जुने सहकारी तसेच अनेक दशके त्यांच्या पत्रकारितेवर निस्सीम प्रेम केलेली मंडळी उपस्थित होती.