ब्रेल लिपीतील 'परीक्षांचे दिवस' पुस्तक प्रकाशित
नवी मुंबई : दै. आपलं नवे शहर चे उपसंपादक राजेंद्र घरत यांच्या मुशाफिरी या स्तंभलेखमालेतील निवडक लेखांचा समावेश असलेल्या 'परीक्षांचे दिवस' या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेमधील माजी प्राचार्य व अन्वय व्यसनमुवती केंद्राचे संस्थापक डॉ अजित मगदूम यांच्या हस्ते करण्यात आले. २५ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुवयात असणाऱ्या घराडी गावातील स्नेहज्योती अंध निवासी विद्यालयात पार पडलेल्या या प्रकाशन समारंभ प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सेनगुप्ता, यश स्नेहा संस्थेच्या पदाधिकारी सौ. आशाताई कामत, पेण येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते बजरंग पाटील, नाट्यप्रेमी सुधाकर पाटील हेही उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ अजित मगदूम यांनी इतवया दुर्गम भागात या संस्थेने चालवलेल्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करताना दुर्गम शब्दाचा खरा अर्थ इथे येताना कळल्याचे सांगितले. स्नेह ज्योती संस्थेने या दृष्टीहीन मुलामुलींतील शैक्षणिक व शिक्षणेतर कलागुण खूप चांगल्या प्रकारे विकसित केल्या बद्दल संस्थाचालकाना धन्यवाद दिले. तसेच राजेंद्र घरत यांनी गेली चौदा वर्षे या शाळेत येऊन ब्रेल लिपीतील पुस्तके प्रकाशित करवून घेण्यात दाखवलेल्या सातत्याबद्दल प्रशंसा केली. स्नेह ज्योती अंधशाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मेहनत घेत असल्यानेच या विद्यार्थ्यांना शिक्षणाप्रमाणेच अन्य कलांमधील रुचि जपता आल्याचेही मगदूम यांनी नमूद केले. पुस्तकाचे लेखक राजेंद्र घरत यांनी आपली आजवर ब्रेल लिपीत आलेली सारीच्या सारी वीस पुस्तके केवळ आणि केवळ मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा सेनगुप्ता यांच्या मेहनतीमुळेच साकारली असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले व या शाळेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच अंगी बाणवलेल्या गायन, संगीत व इतर कलागुणांचेही कौतुक केले. सामाजिक कार्यकर्ते बजरंग पाटील यांनी याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाची स्नेह भेट दिली.