'मानवतेसाठी योग' करीत नवी मुंबईकरांनी उत्साहात साजरा केला जागतिक योग दिन

नवी मुंबई :   'मानवतेसाठी योग'' या संकल्पनेवर आधारित आठवा “आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाद्वारे अत्यंत उत्साहात पार पडला.

    मागील 2 वर्षामध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग अक्षरश: ठप्प झाले होते. या दरम्यान मानवी शरीरासाठी योग किती महत्वाचा आहे याचा प्रत्यय संपूर्ण जगाला आला आहे. भारतीय संस्कृतीमध्ये योगाला अनन्यसाधारण महत्व असून योगाचे महत्व अत्यंत सक्षमपणे जगाला पटवून दिल्याने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले आहे.

    प्रत्येक मनुष्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती व सुदृढतेसाठी योग हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे अनेक निष्कर्षातून अधोरेखीत झालेले आहे. हेच ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आठवा आंतरराष्ट्रीय़ योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील साधारणतः 800 हून अधिक शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध योग संस्थेचे पदाधिकारी व अनुयायी सहभागी झाले होते.

    योग दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम.मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले यांनी महानगरपालिका नागरी सुविधा पुरविण्याबरोबरच नागरिकांच्या आरोग्यासाठी ठोस उपाययोजना करीत असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेच्या वतीने विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून आज जागतिक योग दिवस साजरा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

    याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनामुळे सर्वांचे अतोनात नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे शारीरिक तंदुरुस्तीचे महत्व सर्व जगाला पटलेले आहे असे सांगत यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या योगाचे महत्व प्रसारित करण्यासाठी महापालिकेकडे जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी पाठपुरावा केला व महानगरपालिकेनेही कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हा योग दिन अत्यंत चांगल्या पध्दतीने साजरा केला त्याबद्दल अभिनंदन केले.

    "सिडको" तसेच “द आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेच्या वतीने अत्यंत उत्कृष्ट असे संचलन करण्यात आले व योग दिन पूर्ण करण्यास मोलाचे सहकार्य लाभले. या योग दिनाच्या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या अति.आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, उप आयुक्त जयदिप पवार, मनोजकुमार महाले, दादासाहेब चाबुकस्वार, डॉ.श्रीराम पवार, डॉ.बाबासाहेब राजळे, अनंत जाधव, शहर अभियंता संजय देसाई, अति.शहर अभियंता शिरिष आदरवाड, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, सुनिल लाड, सहा.आयुक्त चंद्रकांत तायडे, काशिनाथ धनवट, सुखदेव यडवे, उप अभियंता किरण पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव व लेखा अधिकारी विजय रांजणे यांनी सहभागी होत योगासने करुन योग दिन उत्साहात साजरा केला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रीय बौद्धिक दिव्यांग जन संस्थेत आंतरराष्ट्रीय योगदिन दिमाखात साजरा