21 जूनला नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साजरा होतोय आंतरराष्ट्रीय योग दिन

नवी मुंबई :   संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केल्यानुसार 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असून यावर्षीच्या आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाकरिता ‘मानवतेसाठी योग’ ही संकल्पना जाहीर करण्यात आलेली आहे.

यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मंगळवार दि. 21 जून 2022 रोजी, सकाळी 6.00 वा., वाशी सेक्टर 30 ए येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगविषयक विशेष उपक्रमाचे आयोजित करण्यात आलेले आहे.

      आरोग्यासह संपूर्ण व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम करणा-या योगाचे महत्व जनमानसात प्रसारित व्हावे यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको महामंडळ आणि द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सहजपणे करता येणा-या विविध योग प्रकारांमुळे शरीराच्या हालचाली होऊन शरीर सुदृढ राखण्यास मदत होते. योगासनांमधील प्राणायाममुळे श्वासाचे संतुलन तसेच शरीरासह मनाचे संतुलन राखण्यास मदत होते. मनाची एकाग्रता वाढविण्यासही याचा उपयोग होतो. शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. शरीरावरच नव्हे तर मनावरही सकारात्मक परिणाम होतो. त्यासोबतच ऊर्जा आणि चैतन्याचा लाभ होतो असा नियमित योग करणा-या अनेकांचा अनुभव आहे.

त्या अनुषंगाने दि. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच आबालवृध्द नागरिक, महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून सध्याच्या तणावग्रस्त जीवनशैलीत योगाचे जीवनातील महत्व तसेच ताणमुक्त जगण्यासाठीची गरज लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कांदा बटाटा बाजारात धोकादायक छताचे सावट कायम