बाल मजुरी निर्मूलन सफ्ताहानिमित्त नेरुळमध्ये सह्यांची मोहीम
नवी मुंबई : बाल मजुरी निर्मूलन सफ्ताहानिमित्त शुक्रवारी सायंकाळी युवा नवी मुंबई चाईल्ड लाईनच्या वतीने नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात बाल मजुरी विरोधात जनजागृती करण्यात येऊन सह्यांची मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी व प्रवाशांनी या मोहिमेला उस्फुर्त प्रतिसाद देत बाल मजुरीच्या विरोधात आपली मते व्यक्त केली. तसेच सह्या केलेले पेपर चिकटवून मोहिमेला समर्थन दिले.
यावेळी नवी मुंबई चाईल्ड लाईनचे समन्वयक व सदस्यांनी लोकांना बाल कामगार रोखण्यासाठी 1098 चाईल्ड लाईन हेल्पलाईनवर कॉल करा असे आवाहन केले. तसेच चाईल्ड लाईन 1098 बाबत माहिती देत त्याबाबत जनजागृती केली. या मोहिमेला युनिसेफ महाराष्ट्राच्या वेस्टर्न रिजनल रिसोर्स सेंटरचे प्रमुख प्रदिप पाचपिंडे यांनी भेट देत या मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांच्या अनेक शंकांना व प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच 12 ते 20 जून या कालावधीत आयोजित बाल कामगार निर्मूलन मोहिमेबाबत माहिती दिली. या सह्यांच्या मोहिमेत युवा नवी मुंबई चाईल्ड लाईनचे समन्वयक विजय खरात, टीम सदस्य प्रेम राठोड, लारा पागडे, राहुल लोखंडे, बुद्धराज बावस्कर यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. या सह्यांच्या मोहिमेत जवळपास 300 नागरिकांनी आपला सहभाग दर्शवला