मेट्रोस्टेशन पिल्लर आणि खांबाची रंगरंगोटी सुरू
खारघर : नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याच्या सेवेला शुभारंभासाठी मुहूर्त मिळत नसल्यामुळे सिडकोकडून खारघर तळोजा दरम्यान असलेल्या सर्व स्टेशन ,पिल्लर आणि खांबाचे रंगरंगोटी केली जात आहे.
नवी मुंबई मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून अत्यावश्यक सर्व चाचण्या झाल्यामुळे महाराष्ट्रदिनी ही सेवा सुरू करण्याचा सिडकोचा प्रयत्न होता.मात्र, मेट्रो सेवा शुभारंभासाठी मुहूर्त मिळाला नाही.दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक केव्हाही लागू शकते, तसेच पनवेल महानगर पालिकेचे कार्यकाळ जून महिन्यात पाच वर्षे पूर्ण होणार आहे. पालिका निवडणूक पूर्वी नवी मेट्रो उद्घाटनासाठी सिडको प्रशासकांनी नगर विकास मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची वेळ मागीतल्याची चर्चा सिडको आणि महामेट्रो विभागात सुरू होती. दरम्यान मेट्रो सुरू करण्याचा मुहूर्त मिळाल्यास खारघर मधील सेन्ट्रल पार्क ते पेंधर स्थानका दरम्यान उभारलेल्या मेट्रो स्थानक तसेच पिल्लर आणि खांब पावसामुळे काळसर पडले आहे. मेट्रो डबा प्रमाणे स्थानक आणि मेट्रो पिल्लर चकचकीत दिसावे यासाठी सिडकोने खारघर ते पेंधर स्थानक दरम्यान रंगरंगोटीचे काम जोरात सुरू केले आहे. या विषयी सिडको अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, नवी मुंबई मेट्रो सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र गेल्या दहा वर्षांपासून उभे असलेल्या मेट्रो रेल्वे मार्गातील पिल्लर आणि स्थानक हे पावसामुळे काळे पडले आहे. उद्घाटन प्रसंगी सुंदर दिसावे यासाठी पिवळा रंगाचे रंग दिले जात असल्याचे सांगितले.