नवी मुंबईत डॉ.आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी महापालिकेकडुन स्थळपाहणी
नवी मुंबई : नवी मुंबईत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. नवी मुंबई महापालिकेने याची दखल घेतली असून गुरुवारी महापालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी डॉ.आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी ऐरोलीतील आंबेडकर स्मारकाजवळच्या ऐरोली-दिवा सर्कल येथील जागेची पाहणी केली. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, युवा नेते ऍड. यशपाल ओहोळ, नवी मुंबई महिला सचिव नंदा गायकवाड, समाजसेवक लक्ष्मण साळवे, वंदना नाईक, निर्मला गमरे, रंजना गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबईत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने करण्यात येत आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यासाठी मोर्चा, उपोषण या सारखी आंदोलने देखील करण्यात आली आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ईशारा मोर्चाच्या वेळी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी रिपाई शिष्टमंडळाला आश्वासन देऊन उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार व शहर अभियंता संजय देसाई यांना स्थळपाहणी करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
ठाणे जिह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील डॉ. आंबेडकर स्मारक लोकार्पण सोहळ्यादरम्यान नवी मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी डॉ.आंबेडकरांचा पुर्णकृती पुतळा उभारण्यासंबंधी महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या होत्या. त्यामुळे महापालिकेने याची दखल घेऊन डॉ.आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासंबधी स्थळ पहाणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणुन गुरुवारी नवी मुंबई महापालिकेचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी ऐरोली येथील आंबेडकर स्मारकाजवळ असलेल्या ऐरोली-दिवा सर्कल या जागेची पाहणी केली. महापालिकेने डॉ.आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी हालचाली सुरु केल्याने रिपाईच्या कार्यकर्त्यांकडुन त्यांचे स्वागत होत आहे.