जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त वाशीत जनजागृती कार्यक्रम
नवी मुंबई : जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त तसेच बाल मजुरी निर्मूलन सफ्ताहाअंतर्गत युवा नवी मुंबई चाईल्ड लाईन व जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग यांच्या संयुक्तविद्यमाने रविवारी वाशी रेल्वे स्टेशनच्या परिसरात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाल अधिकार संघर्ष संघटनेच्या प्रतिनिधींनी बाल मजुरी या विषयाला घेऊन एक `नाटू ' नावाचे पथनाट्य सादर केले.
या जनजागृतीपर कार्यक्रमात नवी मुंबई चाईल्ड लाईनचे समन्वयक विजय खरात यांनी जागतिक बाल कामगार विरोधी दिन व बाल मजुरी निर्मूलन सप्ताह बाबत माहिती दिली. तसेच 18 वर्षांखालील कुठलेही बालक काम करताना दिसल्यास चाईल्ड लाईन 1098, पोलीस, कामगार विभाग, जिल्हा महिला व बाल विकास विभाग यांना संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी नवी मुंबई चाईल्ड लाईनच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित नागरिकांना पत्रके वाटून लहान मुलांच्या मदतीसाठी असलेल्या 1098 या हेल्पलाईनबाबत माहिती दिली. यावेळी वाशी पोलीस स्टेशन मधील पोलिसांची देखील या कार्यक्रमात उपस्थिती होती.