ज्येष्ठ नागरिकांनी फुलवलेल्या वनराईवर उद्यान विभागाने फिरवला नांगर ?
नवी मुंबई :- नवी मुंबईत वृक्ष तोडीचा मुद्दा चांगलाच तापलेला असताना वाशीतील जुहू चौपाटीवर ज्येष्ठ नागरिकांनी फुलवलेल्या वनराईवर उद्यान विभागाच्या माळी कामगारांनी नांगर फिरवल्याने मनपा विरोधात तीव्र संतपा व्यक्त केला जात आहे.
वाशी जुहू चौपटीवर ,असलेल्या जॉगिंग ट्रॅक शेजारी वाशीतील काही ज्येष्ठ नागरिकांनी मागील चार ते पाच वर्षापासून श्रमदानातुन ऑक्सिजन देणारी हुरा, रोहोयो अशी अनेक झाडे लावली होती. तसेच या झाडांना ज्येष्ठ नागरिक अर्वाजून पाणी देत असत आणि या झाडांचे संगोपन करत असत. मागील चार पाच वर्षांत दीड ते दोन हजार झाडांची लागवड या ठिकाणी करण्यात आली होती. जॉगिंग ट्रॅक शेजारी व वन खात्याच्या जमिनीवर ही झाडे असल्याने ती कुणालाही अडसर ठरत नव्हती. मात्र सदर झाडे झुडपे असल्याचे कारण देत येथील माळी कामगारांनी ती झाडे सरसकट उपटून टाकली असून ती फेकून देण्याचा प्रकार केला आहे असा आरोप ज्येष्ठ नागिकांनी केला आहे. त्यामुळे मागील चार पाच वर्षापासून या झाडांवर मुलांप्रमाणे प्रेम करून जगवलेल्या झाडांवर अचानक नांगर फिरवल्याने ज्येष्ठ नागरिकांनी मनपा उद्यान विभागाच्या मनमानी कारभारा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.