वादळी पावसाचा तडाखा ; बत्ती गुल
नवी मुंबई : ९ जून २०२२ रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वारा आणि पावसामुळे, सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी आणि पेण मंडळातील काही फीडरचा वीज पुरवठा थोड्या काळासाठी बंद करण्यात आला होता. वादळाची तिव्रता कमी झाल्यानंतर बिघाड नसणाऱ्या फिडरवरील वीजपुरवठा अर्धा ते दोन तासांमध्ये सुरु करण्यात आला. तर बिघाड असणाऱ्या फिडरवर रात्री अथकपणे काम करुन महावितरण कर्मचाऱ्यांनी अपवाद वगळता रात्रीच वीजपुरवठा सुरळीत केला.
९ जून रोजी संध्याकाळी विजेचा कडकडाटासह आलेल्या वादळी पावसामुळे ठाणे आणि वाशी मंडळातील वीजपुरवठ्यावर जास्त काही परिणाम झाला नाही. वाशी मंडळातील घणसोली गाव, गोठिवली, सेक्टर -२६ कोपरी गाव, कोपरखैरणे, तुर्भे स्टोअर या भागात काही काळासाठी सुरक्षेच्या कारणास्तव विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. तर काही ठिकाणी काही किरकोळ बिघाड झाला होता.
सर्वाधिक बिघाड पीन आणि डिस्क इन्सुलेटरमध्ये बिघाड झाल्याने घडले. उन्हाळ्यात उष्णतेमुळे तापलेल्या पीन आणि डिस्क इन्सुलेटरवर पाणी पडल्याने त्या तडकल्याने अपघात टाळण्याची प्रणाली कार्यान्वित होऊन फिडर ट्रिप झाले. मान्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीच्या कामात अनेक ठिकाणच्या पीन आणि डिस्क इन्सुलेटर बदलले असले तरी उन्हाळ्यात सहज लक्षात न येणारे बिघाड पहिल्या पावसात प्रकर्षाने पुढे येतात. बिघाड असलेल्या वीजवाहिन्यांवर पेट्रोलिंग करुन महावितरणचे कर्मचारी, कंत्राटदाराचे कामगार यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. शक्य त्या ठिकाणी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत केला. तर गुरुवारी रात्री पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरळीत केलेल्या ठिकाणी मुख्य वाहिन्यांवर शुक्रवारी सकाळी दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आपली यंत्रणा सज्ज ठेवण्याचे सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे उद्धिष्ट आपल्यापुढे ठेऊन काम करण्याचे सांगितले.