वाशीतील बीएसईएल टेक पार्क इमारतीत आग बँकेचे कार्यालय जळून खाक, सुदैवाने जिवीत हानी नाही
नवी मुंबई : वाशी रेल्वे स्टेशन लगतच्या बीएसईएल टॉवर इमारतीतील गुरुवारी दुपारी सहाव्या मजल्यावर लागलेल्या आगीत नोवा स्कोटिया बँकेचे कार्यालय जळून खाक झाले. सुदैवाने या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वेळीच कार्यालयातून धाव घेतल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सहाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या ४० कर्मचाऱ्यांची सुटका करुन अर्ध्या तासात येथील आग आटोक्यात आणली. या आगी मागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे सदरची आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बीएसईएल टॉवर इमारतीत विविध कंपन्याचे कार्यालय असून सहाव्या मजल्यावर ६०६ मध्ये नोव्हा स्कोटीया बँकेचे कार्यालय आहे. याच कार्यालयात दुपारी १ च्या सुमारास आग लागली. या आगीमुळे सदर कार्यालयात धुर पसरल्यानंतर या कार्यालयात कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने ते बचावले. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आग लागलेल्या नोव्हा स्कोटीया बँक कार्यालयाच्या बाजुच्या कार्यालयात ४० कर्मचारी आतमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढुन कार्यालयात लागलेली आग आटोवयात आणली. मात्र तोपर्यंत सदर कार्यालयातील सर्व कॉम्प्युटर, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे सदर कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे सदरची आग लागल्याचा संशय व्यवत करण्यात येत आहे. या आगीच्या घटनेमुळे संपुर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते.