एपीएमसीमध्ये मास्क लावण्याचे प्रशासनाचे आवाहन
नवी मुंबई -: मागील दोन आठवड्यापासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत असून कोव्हीड प्रतिबंधाच्या दृष्टीने उपाययोजना करून काळजी घेण्याचे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने बाजार घटकांनी कोरोनाचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून मास्कचा वापर करावा असे आवाहन एपीएमसी प्रशासनाने केले आहे.
करोना बाधितांच्या सध्याच्या वाढत्या संख्येकडे प्रत्येकाने गांभीर्याने बघण्याची गरज असून नागरिकांनी विशेषत्वाने सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा अनिवार्यपणे वापर करणे, स्वआरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्यामुळे मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे ही करोना प्रतिबंधाची त्रिसूत्री अंमलात आणावी आणि विहित वेळेत कोव्हीड लसीचा सूरक्षात्मक डोस घेऊन स्वत:ला संरक्षित करून घ्यावे असे आवाहन महापालिकेने ही केले आहे. पहिल्या करोना लाटेत एपीएमसी बाजार समिती ही करोना संसर्गाचा केंद्र बिंदू ठरली होती. नवी मुंबई शहरात तसेच इतर ठिकाणी एपीएमसी मधून संसर्ग फोफावला होता. आता पुन्हा करोना रुग्ण वाढत असून बाजार समितीत कोरोना चा फैलाव अधिक होऊ नये म्हणून मास्क चा वापर करावा असे परिपत्रक एपीएमसीने काढले आहे.