पर्यावरण दिनी ऐरोली मधील पत्रकारांकडून वृक्षारोपण

ऐरोली : जागतिक पर्यावरण दिनी ऐरोली मधील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन ऐरोली मध्ये वृक्षारोपण केले. तसेच ऐरोलीतील पर्यावरण प्रेमींचा वृक्ष रोपे देऊन सत्कार केला.

वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत.  परिणामी पर्यावरणाचे नुकसान झाल आहे. जगभरामध्ये दर तीन सेकंदांनी एखाद्या फुटबॉल मैदानाएवढे जंगल नष्ट होत आहे. याला कुठे तरी अंकुश बसावा तसेच पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे, हाच जागतिक पर्यावरण दिन  साजरा करण्यामागचा आमचा हेतू आहे, असे ज्येष्ठ पत्रकार अरविंद माने यांनी सांगितले.

सध्या नवी मुंबईत वृक्ष तोडी वरून राजकारण पेटले आहे. परंतु विकासाच्या नावाखाली सुमारे ३००० पेक्षा अधिक झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे. पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेता ऐरोलीतील पत्रकारांनी जागतिक पर्यावरण दिनी ऐरोली सेक्टर-१० येथे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम राबविला. 

याप्रसंगी १० कडुलिंब, १ आंबा आणि १ पेरु, अशी एकूण १२ झाडे लावण्यात आली. या प्रत्येक झाडाची उंची किमान ३ फूट असल्याने झाडे लवकर वाढण्यास मदत होणार आहे. मुख्य म्हणजे या १२ झाडांची जबाबदारी ऐरोलीतील पत्रकारांनी घेतली असून,  लावलेल्या वृक्षारोपांची योग्यरित्या देखभाल सुध्दा करण्यात येणार आहे.

यावेळी ऐरोली, दिघा, रबाळे या क्षेत्रात स्वखर्चाने सुमारे १२००  झाडे लावून त्यांची योग्यरीत्या देखभाल करणाऱ्या ममता महाराणा या पर्यावरण प्रेमी महिलेचा वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विथ देम फॉर देम या संघटने मार्फत मागील २ वर्षांपासून ऐरोली, वाशी खाडी किनाऱ्यावर असलेल्या खरफुटीतून सुमारे २-३ हजार टन प्लस्टिक, कचरा जमा केलेले संघटनेचे अध्यक्ष आशिष सावंत यांचा देखील वृक्ष रोप देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरविंद माने, के. के. मिश्रा, विजय गायकवाड, सुरेश मंगळूरकर, प्रशांत ससाणे, दिलीप काकनाटे, सुमेध वाघमारे, सुनील पगार,  मंगेश कांबळे, जयदीप वाघमारे, संतोष राठोड आदींसह पर्यावरण प्रेमी नागरिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हॅप्पी स्ट्रीट कार्यक्रम उत्साहात संपन्न