प्रकल्पांना विरोध करून जनतेची दिशाभूल - एम के मढवी
नवी मुंबई -:कोपरी वाशी उड्डाण पुलासाठी अनावश्यक खर्च केला जात असून असले प्रकल्प हे सत्ताधारी निवडणूक फंडासाठी करत आहेत असा आरोप आमदार गणेश नाईक यांनी केला आहे. मात्र सदर कामास २००८ सालीच महासभेने मंजुरी दिली आहे आणि तेव्हा सत्तेत कोण होते? तसेच या याधी एका एका दिवसात करोडो रुपयांची कामे पास केली आहेत. मग ती कुठल्या फंडासाठी केली होती ? असा सवाल करत आमदार नाईक यांचा विरोध म्हणजे जनतेची दिशाभूल करणारा आहे असा आरोप एम के मढवी यांनी केला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पामबीच मार्गावर कोपरी वाशी ३५० कोटी रुपये खर्च करून उड्डाण पुल बांधण्यात येणार आहे. मात्र सध्या महासभा अस्तित्वात नसल्याने प्रशासनाने अनावश्यक कामे हाती घेतली आहेत. मात्र सदर कामे ही राज्यातील सत्ताधारी आगामी निवडणुकांच्या फंडासाठी करत आहेत असा आरोप आमदार नाईक यांनी केला असून याबाबत नाईक यांच्या वतीने आज जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. मात्र या कामाला २००८ साली अंजनी भोईर महापौर असताना ४६० कोटी रुपये खर्चाला महासभेत तातडीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आमदार नाईक यांचा विरोध म्हणजे जनतेची निव्वळ दिशाभूल करत आहेत. जर कोपरी उड्डाण पूल अनावश्यक आहे तर ठाणे बेलापूर मार्गावर बनवलेला सी ब्रीज कुणासाठी केला, तो अनावश्यक खर्च नाही वाटला का? तसेच या ब्रीजसाठी व ठाणे बेलापूर मार्गावरील इतर उड्डाण पुल सर्व्हिस रस्त्यासाठी ३१०० झाडे तोडली तेव्हा आमदार नाईक यांचा पर्यावरण प्रेम कुठे होते. त्यामुळे कोपरी उड्डाण पुलाला झाडांच्या आडून आमदार गणेश नाईक जे पर्यावरण प्रेम दाखवत आहेत ते बेगडी प्रेम आहे. असा आरोप मढवी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.