सानपाड्यातील दिव्यांगांचे 'संवेदना' उद्यान अंधारात
नवी मुंबई - नवी मुंबई महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सानपाडा येथील दिव्यांगांच्या 'संवेदना' उद्यानातील विद्युत दिव्यांची मोडतोड झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून उद्यानात विद्युत दिवे बंद पडले आहेत. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आक्रमक झाली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष यांनी उद्यानातील विद्युत दिव्यांच्या दुरवस्थेबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे तक्रार केली आहे.
उद्यानाचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठी सानपाडा सेक्टर १० येथे 'संवेदना' उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या पंचद्रियांवर आधारित संकल्पनेवर 'संवेदना' हे उदयान विकसित करण्यात आले आहे. राज्यातील हा पहिला उपक्रम असल्याने विविध स्तरांतून महापालिकेचे कौतुक केले जात होते. उदयानात आकर्षक सजावट तसेच वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने सकाळी आणि सायंकाळी उदयानात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, काही महिन्यांतच उदयानातील विविध सुविधांची दुरवस्था झाली असून, त्याच्या देखभाल व दुरुस्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. उदयानात आकर्षक विद्युत दिवे बसविण्यात आले आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सर्वच दिवे बंद पडले असून, अनेक दिव्यांची मोडतोड झाली आहे. विद्युत दिवे बंद असल्याने संध्याकाळी उद्यानात अंधार पसरलेला असतो. त्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे योगेश शेटे यांनी पत्रात म्हटले आहे.
तसेच उद्यानातील रेलिंगची देखील दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या अभावामुळे उद्यानात बंद असलेली विद्युत व्यवस्था तसेच रेलिंगच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी योगेश शेटे यांनी महापालिका आयुक्तांकडे मागणी करत सदर मगणीची दखल न घेतल्यास 'मनसे' स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी योगेश शेटे यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता. यावर महापालिका कर्मचाऱ्यांकडून 'संवेदना' उद्यानातील नादुरुस्त विद्युत दिव्यांची पाहणी करून. येत्या दोन दिवसांत 'संवेदना' उद्यानातील विद्युत दिव्यांची दुरुस्ती करणार असल्याचे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता मंगलदास कुंवर यांनी सांगितले.