यंदाही नवी मुंबई शहरावर पुराचे सावट कायम
नवी मुंबई-: नवी मुंबई शहरातील धारण तलावांच्या सफाईला अजून परवानगी न भेटल्याने धारण तलावांच्या गाळ काढण्याबाबत कोणतीही हालचाल नाही. त्यामुळे यंदाही नवी मुंबई शहरावर पुराचे सावट कायम आहे. त्यामुळे या पावसाळ्यात बेलापूरमध्ये पाणी तुंबले तर त्या धारण तलावात उडी मारून आत्महत्या करेन असा ईशारा माजी नगरसेवक जयाजी नाथ यांनी दिला आहे. तर आमदार गणेश नाईक यांनी कायदा हातात घेऊन स्वतः धारण तलावांची स्वच्छता करेन असा इशारा दिला आहे.
नवी मुंबई शहरात धारण तलाव हे सिडकोने शहरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधले होते. परंतु गेले २५ वर्षे त्यामधील गाळ न काढल्याने कांदळवन वाढले आहेत. त्यामुळे त्याची स्वच्छता रखडली आहे. याबाबत जयाजी नाथ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका देखील दाखल केलेली आहे. दीड वर्षांपूर्वी न्यायालयाने स्वच्छता करण्याचे निर्देश ही दिले आहेत. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथरिटी (एमसीझेडएमए) यांनी याबाबत सविस्तर अभ्यास करून, प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना नवी मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या होत्या. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत आय. आय. टी. मुंबई आणि सलीम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी अॅण्ड नॅचरल हिस्टरी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी करून, त्याबाबतचा प्राथमिक पाहणी अहवाल प्राप्त केलेला आहे व सदरचा अहवाल राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. मात्र तो अद्याप पटलावर घेण्यात आलेला नाही, त्यामुळे प्रायोगिक तत्वावर बेलापूर येथील धारण तलावाची स्वच्छता रेंगाळत आहे.
नवी मुंबईतील सी. बी. डी. विभाग हा खाडीकिनारी वसलेला आहे. त्यामुळे सी. बी. डी. कार्यक्षेत्रात भरतीच्या दिवशी कायम खाडीचे पाणी रस्त्यावर येत असते. यासह खाडीचे पाणी शहरात घुसू नये, यासाठी सिडकोने शहराच्या रक्षणासाठी तयार केलेले होल्डींग पाँड हे गाळ व कांदळवनांनी काठोकाठ भरलेले आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सी.बी.डी. कार्यक्षेत्रात पाणी घुसून शहरातील घरांचे व दुकानांचे खूप नुकसान होत आहे. निसर्ग वादळात जवळपास रु.४० कोटीचे नुकसान व्यापाऱ्यांना सोसावे लागले आहे. धारण तलावातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाल्यास, सी.बी.डी. येथील सेक्टर-४, ५ व ६ मध्ये पाणी तुंबण्याच्या त्रासापासून हजारो नागरिकांची सुटका होईल.
धारण तलाव स्वच्छ करण्याबाबत लोकप्रतिनिधीनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुरुवारी महापालिका आयुक्त दालनात जयाजी नाथ यांनी काळ्या फिती लावून स्वच्छता न झाल्याने निषेध व्यक्त केला. तर यंदा बेलापूर मध्ये पाणी तुंबले तर धारण तलावात उडी मारून आत्महत्या करेन असा इशारा दिला आहे. तर धारण तलाव सफाई बाबत तत्काळ तोडगा काढून धारण तलाव साफ न केल्यास वेळ प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षितेसाठी स्वतःकायदा हातात घेत पोकनेल घेऊन धारण तलाव साफ करणार असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.