करोडो रुपयांची अनावश्यक कामे रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन
५ जून रोजी जनआंदोलनाचा लॉंग मार्च
नवी मुंबई: राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली पालिका प्रशासनामार्फत नवी मुंबईत करोडो रुपयांची अनावश्यक कामे काढली जात असून ही कामे तात्काळ रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
आमदार नाईक यांनी गुरुवारी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचीशहरातील विविध प्रलंबित विषयांवर बैठक घेतली. यावेळी ऐरोली विधानसभा मतदार संघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे , माजी सभागृहनेतेरवींद्र इथापे , माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित होते.
आजच्या बैठकीत नाईक यांनी अरेंजा कॉर्नर ते कोपरी सिग्नलउड्डाणपूल, वाशीतील एसटीपी प्रकल्पा शेजारील भूखंडावर प्रस्तावित बायो सीएनजी प्रकल्प आणि वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण या कामांच्या निविदा तात्काळ रद्द करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. कोपरीचा उड्डाणपूल हा सध्या प्राधान्याचा विषय नसून त्याऐवजी वाशी ते घणसोली हा लोकोपयोगी रखडलेला पाम बीच मार्ग पूर्ण करावा, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय या उड्डाण पुलासाठी 390 झाडांचा बळी जाणार आहे. ही झाडे तोडू
देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. वाशीमध्ये अतिशय मोक्याच्या जागेवरठेकेदाराला मलिदा मिळवून देण्यासाठी बायो सीएनजी प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. महापालिकेचा एकात्मिक घनकचरा विल्हेवाट प्रकल्प असताना कमी क्षमतेचा दुसरा स्वतंत्र प्रकल्प कशासाठी हवा असा प्रश्न उपस्थित करत नाईक यांनी करोडो रुपयांचे उत्पन्न ज्या जागेतून महापालिकेला मिळू शकतं ती जागा ठेकेदाराच्या घशात घालण्यास विरोध केला. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा नवी मुंबईतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचं केंद्र आहे. या चौकाचे अगोदरच सुशोभीकरण झाले असताना पुन्हा एकदा मलिदा खाण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची निविदा नव्याने काढण्यात
आली आहे. ही निविदा तातडीने रद्द करण्याची मागणी आमदार नाईक यांनी केली. महापालिका आयुक्त बांगर यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देताना लोकनेते आमदार नाईक यांनी आज सडेतोड भूमिका मांडली. प्रशासक म्हणून पालिका आयुक्त केवळ आपत्कालीन कामांना मंजूर करून ती करून घेऊ शकतात परंतु धोरणात्मक निर्णय घेण्याचा आयुक्तांना प्रशासक म्हणून अधिकार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. असे असताना पालिका प्रशासनाच्या वतीने करोडो रुपयांची अनावश्यक कामे काढून राज्यातील सत्ताधार्यांसाठी
निवडणूक निधीची सोय करण्यात येते आहे काय? असा थेट सवाल केला. लवकरच महापालिकेची निवडणूक होणार असून लोकनियुक्त लोकप्रतिनिधी शहरासाठी
धोरणात्मक निर्णय घेतील असे त्यांनी नमूद केले.
संदीप नाईक यांनी रोखठोक भूमिका मांडत शहराच्या हिताची काळजी घेणे आयुक्तांचे कर्तव्य आहे असे सांगत अनावश्यक आणि नियमबाह्य कामे करण्यासाठी पालिकेची यंत्रणा तत्परतेने हालते परंतु जनतेच्या सुविधांची आवश्यक कामे करण्यासाठी अधिकारी उदासीन असतात, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले. शहराच्या यशाबद्दल पुरस्कार स्वीकारण्यासाठी आयुक्त महोदय समारंभाला जात असतात त्याच प्रकारे स्वतःच्या अधिकारांचा वापर करून त्यांनी शहर हिताचे काम देखील अधिकारांचा वापर करून केले पाहिजे असा
इशारेवजा सल्ला दिला.
माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी वनविभागाने टाकलेल्या वनांच्या आरक्षणाला आव्हान देत क्षेत्रीय सभेच्या परवानगीशिवाय वनांची आरक्षणे टाकता येत नाहीत असा मुद्दा मांडला. वाशी येथे वनविभागाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या भिंतीचे काम बंद करण्याची मागणी केली.
गुन्हे दाखल झाले तरी चालेल जेसीबी घेऊन धारण तलाव साफ करणार....
गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करूनही बेलापूर येथील धारण तलाव महापालिकेने साफ न केल्याने या वर्षी देखील पावसाळ्यात या भागात पाणी तुंबण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेच्या हलगर्जीपणा विरोधात या भागातील माजी नगरसेवक डॉक्टर जयाजी नाथ आणि स्थानिक रहिवाशांनी काळ्या फिती लावून पालिका प्रशासनाचा निषेध केला. पावसाळ्यात रहिवाशांचे हाल बघवत नाहीत आता आत्महत्या करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असे डॉक्टर नाथ उद्विग्नपणे म्हणाले असता लोकनेते आमदार नाईक यांनी जर बेलापूरमधील धारण तलाव तातडीने साफ करण्यास घेतले नाहीत तर मी स्वतः जेसीबी चालवून हे तलाव साफ करून घेईल. मग आमच्यावर जे काही गुन्हे दाखल व्हायचे आहेत ते होऊ देत आम्हाला त्याची पर्वा नाही असा इशारा दिला. धारण तलावातील खारफुटीला धक्का न लावता त्यामधील गाळ काढून तो स्वच्छ करता येईल असा
सल्ला लोकनेते नाईक यांनी आयुक्तांना दिला.
५ जून रोजी जनआंदोलनाचा लॉंग मार्च...
आयुक्तांबरोबरची बैठक झाल्यानंतर लोकनेते आमदार नाईक यांनी 5 जून 2022 रोजी जागतिक पर्यावरण दिनी नवी मुंबई भाजपाच्या वतीने जन आंदोलनाचा लॉंग मार्च लोकशाही मार्गाने, शांततेत काढण्यात येणार असल्याची माहिती दिली. 5 जून रोजी सकाळी दहा वाजता ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून हा लॉंग मार्च मार्गस्थ होणार आहे. शहरातल्या विविध भागांमधून फिरून या लॉंग मार्चची सांगता कोपरी येथे होणार आहे. कोपरी येथे आमदार नाईक यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. लॉंग मार्च मध्ये नवी मुंबईवर होणाऱ्या अन्यायाची माहिती जनतेला दिली जाणार आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून लॉंग मार्च दरम्यान विविध ठिकाणी वृक्षारोपण केले जाणार आहे. पर्यावरण जनजागृती केली जाणार आहे.
बैठकीत आयुक्तांकडून मान्य करून घेतलेले महत्त्वाचे विषय.....
ऐरोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या डोमचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची चौकशी होणार.
आदिवासींना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी वनहक्क समितीची स्थापना केली जाणार.
अडवली-भूतवली येथील घरकुल योजनेपासून वंचित सहा आदिवासींना घरे मिळणार.
दिघा येथे ठाणे-बेलापुर मार्ग रुंदीकरणात बाधित 64 रहिवाशांना घरे मिळणार.
वाशीच्या मोडकळीस आलेल्या रो हाऊसेसची दुरुस्ती करू देण्यास आयुक्तांचा होकार.
नवी मुंबईतील दिव्यांगांना मिळणार स्टॉल.
घणसोलीच्या स्मशानभूमीत सुविधा मिळणार.
पावणे एमआयडीसी, इंदिरानगर व अन्य पाणीटंचाईग्रस्त भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होणार.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात...
महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे नवीन व्हेरीयंट सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी. कोरोना उपचार केंद्रे सुरू करण्याची तयारी ठेवावी अशा मौलिक सूचना करतानाच आमदार नाईक यांनी नवीन शैक्षणिक वर्षात शाळा लवकरच सुरू होणार असून त्यादृष्टीने देखील खबरदारी घेण्याचे आवाहन केले.