झाडे तोडून त्या जागेवरील भूखंड विक्रीचा डाव ?
नवी मुंबई :- महापे एमआयडीसीत रस्ता क्राँकीटीकरण करण्याच्या कामात अडथळा ठरत असल्याच्या नावाखाली सुमारे २८२९ झाडे कापली जाणार आहेत. प्रत्यक्षात रस्त्याच्या कडेला असणारी ही झाडे तोडून या ठिकाणी मोकळ्या जागेवर चाळीस मीटर भूखंड तयार करून ती विकण्याचा एमआयडीसीचा डाव असून या विरोधात राज्य शासनाकडे तक्रार करून देखील कानाडोळा केला जात असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी केला आहे.
औद्योगिक परिसरात रस्त्याच्या कामासाठी २८२९ झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे. या विरोधात जनआंदोलन उभे राहत असताना काही अपवाद राजकीय नेत्यांनी मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे पहावयास मिळत आहे . ऐरोलीचे आमदार माजी पर्यावरण मंत्री गणेश नाईक यांना याबाबत छेडले असता त्यांनी याबाबत नागरिकांनी अधिकाऱ्यांना पत्र देवून हरकती नोंदव्याव्या असे मोघम उत्तर देवून या विषयावर बोलण्याचे टाळले. मात्र माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी या प्रकाराविरोधात संताप व्यक्त केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात मोकळी जागा असून या जागेच्या पलीकडे झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे तोडून त्या ठिकाणी छोटे भूखंड तयार करून ते विकण्याचा उद्योग खात्याचा डाव आहे. यापूर्वी जलवाहिनी व नाल्यांवर असे भूखंड तयार करून हॉटेल सारख्या सेवा उद्योगांना हे छोटे भूखंड वितरित करण्यात आले आहेत. या विरोधात राज्य शासनाकडे दाद मागून देखील याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा सोनवणे यांनी केला आहे. रस्त्याच्या कामात अडसर नसताना एव्हढ्या मोठ्या प्रमाणात जी झाडे तोडली जात आहेत त्या ठिकाणी भूखंड तयार करून हे भूखंड विक्रीसाठी उपलब्ध केले जातील असा गंभीर आरोप सुधाकर सोनवणे यांनी केला आहे. या गंभीर आरोपामुळे उद्योग विभागाच्या कारभारावर आता संशय व्यक्त केला जात आहे. चाळीस मीटर क्षेत्राचे भूखंड तयार करण्यासाठी झाडांचा बळी देण्यासाठी रस्त्याच्या कामात बाधा होत असल्याचे निमित्त पुढे करण्यात आले आहे.