व्यसनापासून दूर रहा -  सहायक आयुक्त 

खारघर :  तंबाखूचा हा हल्ला रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतः व्यसनापासून दूर राहतानाच, आपल्या कौटुंबिक परिघात, मित्र-मंडळींनाही व्यसनापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. ते आपले कर्तव्य आहे, असे आवाहन सहायक आयुक्त मिताली संचेती यांनी केले. यावेळी  नवी मुंबई अन्वय व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अजित मगदूम, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे मिलिंद पाटील, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या मीरा आणि इंदूबेन दीदी समाज विकास विभागाचे समाज विकास अधिकारी सर्जेराव परांडे, परिमंडळ एकचे प्रशासकीय अधिकारी सुदेश परब आदी  उपस्थित होते. 

३१ मे जागतिक तंबाखू सेवन वर्ज्य दिनाचे औचीत्त्य साधून एक जून रोजी नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिमंडळ कार्यालयात परिमंडळ कार्यालय आणि समाज विकास विभागातील कर्मचाऱ्यांसाठी अन्वय व्यसन मुक्ती केंद्र, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या संयुक्त  विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते. यावेळी संचेती यांनी वरील आवाहन केले. तर अजित मगदूम यांनी शाळा आणि महाविद्यालयीन तरुण व्यसनाच्या आहारी कसे जातात या विषयी मार्गदर्शन करून व्यसनामुळे होणारे अपघात आणि त्यामुळे कुटुंबावर होणारे परिणाम या विषयी माहिती दिली.आजची तरुणाई या सर्व नशा करणार्‍या गोष्टींकडे आकर्षित होत चालली आहे व हे साफ चुकिचे आहे. आपले व आपल्या देशाचे भवितव्य आपण अंधारात ढकलतो आहोत.  त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे  सांगितले. तर मिलिंद पाटील यांनी तंबाखू, मावा आणि गुटखा यामुळे होणाऱ्या  कॅन्सरची लागण कश्या प्रकारे होते या विषयी माहिती दिली. तर मीरा दीदी आणि वाशी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या वतीने व्यसन मुक्तीवर मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रम परिमंडळ एकचे उपायुक्त दादासाहेब चाबूकसार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन