आठ तास ड्युटीमुळे महिला पोलीस कर्मचारी समाधानी
नवी मुंबई पोलिस दलात ५०० पदे रिक्त
नवी मुंबई : मुंबई पोलिस दलातील महिला कर्मचाऱयांपाठोपाठ इतर पोलिस कर्मचाऱयांनाही आठ तास ड्युटी देण्याच्या हालचाली मुंबई पोलिस दलात सुरु झाल्यानंतर नवी मुंबई पोलिस दलातील पुरुष कर्मचाऱयांनाही आठ तासांच्याड्युटीचे वेध लागले आहेत. परंतु, आठ तासाची ड्युटी सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांना देता येणे शक्य नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांचे म्हणणे आहे. त्यामुळे आधीच अपुरे मनुष्यबळ असलेल्या नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात महिलांव्यतिरिक्त इतर कर्मचाऱयांना ८ तास ड्युटी देण्याचा प्रयोग राबवणे तूर्तास शक्य नसल्याचे दिसून येते. पोलिस विभागाच्या कामकाजाचा एकंदरीत आवाका लक्षात घेता पुरुष कर्मचाऱ्यांना सरसकट आठ तासांची ड्युटी देणे पोलिस दलाच्या कार्यपध्दतीच्या विसंगत ठरणारी आहे.
जनतेच्या जीविताचे तसेच मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस दलावर मोर्चे, आंदोलन, व्हीआयपी सिक्युरिटी, सण, उत्सव, सभा-संमेलने, रस्ते वाहतूक यांसह अनेक कामांची जबाबदारी येऊन पडते. त्यामुळे गुन्हेगारीवर अंकुश ठेवून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखताना अपुऱया मनुष्यबळामुळे पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात पोलिसांच्या कामाची कोणतीच वेळ निश्चित नसल्यामुळे कामावरून घरी कधी परतणार हे त्या कर्मचाऱयाला देखील माहिती नसते. या सर्व धकाधकीत व कामाच्या रगाड्यात कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष पोलिसांना त्रासदायक ठरत आहे.
कामाच्या व्यापामुळे पोलिसांना कधी कधी १२ तासांपेक्षाही अधिक तास ड्युटी करावी लागते. अनेकवेळा त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्याही रद्द केल्या जातात. परिणामी अती कामाच्या ताणामुळे पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ लागल्याने पोलिसांची ड्युटी आठ तास करण्याचा विषय गेले चार-पाच वर्षे चर्चीला जात आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची ड्युटी आठ तासांची होणार का? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे.
नवी मुंबई पोलिस दलात ८३८ महिला कर्मचाऱयांसह ४ हजार १७१ कर्मचारी आहेत. अधिकाऱ्यांची संख्या ४६१ इतकी आहे. अशाप्रकारे नवी मुंबई पोलीस दलात ४ हजार ६३२ अधिकारी-कर्मचारी असून आयुक्तालयाकरिता मंजूर पदांपेक्षा ४९८ अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर नवी मुंबई शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम सध्या सुरू आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत २० पोलिस ठाणी असून गुन्हे शाखा व वाहतूक विभागाच्या युनिट्ससह इतरही वेगवेगळ्या शाखा कार्यरत असून त्यांच्यावर देखील सध्या कामाचा ताण पडत आहे.
त्यातच ८३८ महिला कर्मचाऱयांना ८ तासाची ड्युटी करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात पुरुष पोलिसांवर कामाचा ताण वाढत आहे. अपुऱया मनुष्यबळामुळे इतर पोलीस कर्मचाऱयांना आठ तासांची ड्युटी करणे शक्य नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास आठ तासांच्या ड्युटीचा निर्णय संयुक्तिक ठरेल असे ते म्हणाले.
साप्ताहिक सुट्ट्या, आजारपण वा अन्य कारणास्तव कर्मचारी सुट्ट्या घेत असल्याने दररोज प्रत्यक्षात कामासाठी कमी कर्मचारी उपलब्ध होतात. अनेक पोलिस कर्मचारी दूरवर राहतात. आठ तासांची ड्युटी करून घरी गेल्यानंतर पुन्हा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने या कर्मचाऱयांना परत बोलवणार कसे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिस दलातील पुरुष कर्मचाऱयांना आठ तासांची ड्युटी लागू करण्यात अनेक अडचणी येत असल्याचे सांगितले जाते.
नवी मुंबईच्या तुलनेत मुंबई पोलिस दलातील कर्मचाऱयांची संख्या अधिक असल्याने मुंबईत आठ तासांची ड्युटी शक्य असल्याचे बोलले जाते. नवी मुंबई पोलीस दलातील महिला कर्मचाऱयांना आठ तासांची ड्युटी देण्यात आली असल्यामुळे महिला कर्मचारी समाधानी असून त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. पोलिस दलावरील कामाचा वाढता ताण व अपुऱया मनुष्यबळामुळे नवी मुंबईतील पुरुष कर्मचाऱयांना आठ तासांचीड्युटी देणे तूर्तास शक्य नसल्याचे पोलीस उपायुक्त (मुख्यालय) अभिजित शिवथरे यांनी सांगितले.