विमानतळाच्या नामकरणासाठी मानवी साखळी आंदोलन करणाऱया प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीसा
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी येत्या 10 जुन रोजी मानवी साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांनी हे आंदोलन करु नये यासाठी नवी मुंबई पोलिसांनी सर्वपक्षीय कृती समितीतील नेते व प्रमुख कार्यकर्त्यांना 149 प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मात्र त्यानंतर देखील हे आंदोलन करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. त्यामुळे पोलीस कोणती भुमीका घेतात, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी माजी खासदार दि.बा.पाटील यांनी अनेकदा लढा उभारुन नोकरी, रोजगार, पुनर्वसन आणि मोबदल्यासाठी संघर्षमय आंदोलने केली आहेत. त्यामुळे दि.बा.पाटील हे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी म्हणून ओळखले जातात. नवी मुंबई शहरात विमानतळाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची वास्तू निर्माण होत असल्याने,दि.बा.पाटील यांच्या कार्याचा गौरव कायमस्वरुपी राहावा म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी येथील प्रकल्पग्रस्तांनी अनेक वर्षापासून सरकार दरबारी केली आहे. त्यासाठी विविध राजकिय पक्षाचे स्थानिक कार्यकते व नेते एकत्र आले असताना तसेच नवी मुंबईत आतंरराष्ट्रीय विमानतळ उभारणीचे काम प्राथमिक स्तरावर सुरु असतांना, या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडको संचालक मंडळाने काही दिवसापूर्वी मंजूर करुन तो राज्य मंत्रीमंडळाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष पसरला आहे.
त्यामुळे राज्यातील सरकारचा व सिडको व्यवस्थापनाचा निषेध करण्यासाठी व सरकारने नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती तयार केली आहे. या कृती समितीच्यावतीने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जुन रोजी मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे. या मानवी साखळी आंदोलनात नवी मुंबईतील 95 गावातील प्रकल्पग्रस्त त्याचप्रमाणे पालघर, मुंबई, रायगड आणि ठाणे जिह्यातील आगरी-कोळी समाजातील नागरिक मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत. ही मानवी साखळी काढुन प्रकल्पग्रस्त आपली भावना व्यक्त करणार आहेत.