नवी मुंबईतील शिक्षण संस्थाचालकांकडून मैदानांचा व्यावसायिक वापर

प्रशासनाची फसवणूक करून मालमत्ता हडप केल्याप्रकरणी संबधित संस्था चालकांवर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

नवी मुंबई - नवी मुंबईतील शिक्षण संस्था चालकांनी सार्वजनिक मैदानांचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना बुधवार, दिनांक १ जून २०२२ रोजी लेखी पत्र दिले. प्रशासनाची फसवणूक करून मालमत्ता हडप केल्याप्रकरणी संबंधित शिक्षण संस्था चालकांवर गुन्हा दाखल करण्याची यावेळी मनसे विद्यार्थी सेनेकडून मागणी करण्यात आली. यावेळी मनसे विभाग अध्यक्ष योगेश शेटे, मनसे विद्यार्थी सेना नवी मुंबई उपशहर अध्यक्ष निखिल गावडे, उपशहर अध्यक्ष दशरथ सुरवसे उपस्थित होते.

नवी मुंबईमधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यासाठी सिडको व महापालिकेने सर्व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय यांना मैदाने उपलब्ध करून दिलेली आहेत. शाळा  व महाविद्यालय यांच्या वेळेव्यतिरिक्त ही मैदाने स्थानिक मुलांना खेळासाठी उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक शिक्षण संस्था चालकांनी मैदानांचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. अपवाद वगळता बहुतांश शिक्षण संस्था चालकांनी मैदाने बंदिस्त करून स्थानिकांचा अधिकार डावलला आहे. त्यामुळे स्थानिक मुलांची मैदानी खेळांची गैरसोय होत असल्याचे मनसे विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे यांनी पत्रात म्हटले आहे.

 शिक्षण संस्थांना वापरासाठी दिलेले मैदान परस्पर त्रयस्थ संस्थेच्या घशात घातल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे. सीवूडस मधील डीपीएस, ऑरचिड इंटरनॅशनल, डॉन बोस्कॉ, नेरुळ मधील तेरणा, एन.आर.भगत, घणसोली येथील एएसपी स्कुल यांसारख्या अनेक शिक्षण संस्थांनी एका बाजूला काँक्रीटीकरण करून तसेच कृत्रिम गवत लावून मैदाने बंदिस्त केली आहेत. तसेच मैदानात अवैधरित्या फुटबॉलचे टर्फ बनविण्यात आलेले आहेत. शुल्क आकारून फुटबॉलसाठी हे मैदान दिले जात आहे.

  सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली मैदाने शाळा, महाविद्यालय व खाजगी संस्थांकडून आता बळकविण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित सर्व संस्थांवर सिडको तसेच महापालिकेची फसवणूक करून मालमत्ता हडप केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून मैदानात अवैधरित्या उभारण्यात आलेले फुटबॉलचे टर्फ ७ दिवसांत हटवावेत अशी मागणी संदेश डोंगरे यांनी पत्रातून केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या 'मनसे स्टाईल' ने आंदोलन करून मैदानात अवैधरित्या तयार करण्यात आलेल्या फुटबॉल टर्फच्या खेळपट्या उखडून टाकण्याचा इशारा संदेश डोंगरे यांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा इंटकच्यावतीने सत्कार