उरणचे किनारे मच्छिमार नौकांनी गजबजले 

उरण : जून महिन्यापासून खोल समुद्रातील मासेमारीला सरकारने बंदी घातली असल्यामुळे उरणचे किनारे मच्छिमारी नौकांनी गजबजून गेले आहेत. मच्छिमारांनी आपल्या मच्छिमारी नौका समुद्र किनारी शाकारून (नांगरून) ठेवल्या आहेत. उरण तालुक्यातील मोरा बंदर, करंजा बंदर, दिघोडे येथे हजारो नौका सध्या विसावा घेत आहेत. 1 जून ते 31 जूलै पर्यंत खोल समुद्रातील मासेमारी बंद असते. उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मासेमारीचा व्यवसाय चालतो.

 जून-जूलै हा महिना माश्यांचा प्रजननाचा आणि अंडी देण्याचा आणि या महिन्यात समुद्र खवळलेला असल्यामुळे 1 जून ते 1 ऑगस्ट या दरम्यान खोल समुद्रातील मासेमारीवर शासनाचे बंधन असते.  मच्छिमार बांधव देखिल या काळात खोल समुद्रातील मासेमारी करत नाहीत. या दोन महिन्याच्या काळात ते आपल्या होड्यांची दुरूस्ती, रंगरंगोटी, जाळी सुधारणे अशा प्रकारची कामे करतात. खरं तर दरवर्षी राज्यात 15 ऑगस्ट किंवा नारळी पौर्णिमेपैकी जो दिवस आधी येईल त्यादिवशी मासेमारीवरची बंदी उठवली जायची. पण इतर राज्यातली बंदी 1 ऑगस्टला उठवतात. त्यामुळे बाहेरचे मच्छिमार याठिकाणी येऊन व्यवसायाला सुरुवात करायचे. त्यामुळे इथल्या मच्छिमारांचं नुकसान व्हायचं. त्यामुळे देशभरातल्या सर्वच किनारपट्टी भागातल्या बंदी कालावधीत सुसूत्रता आणण्यासाठी प्रशासनाकडून 1 जून ते 31 जुलै असा बंदी कालावधी ठरवण्यात आला आहे.

 जीवावर उदार होउन मासेमारी करून आपली उपजिवीका करणाऱ्या मासेमारांची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. 15 लाखाच्या वर कुटूंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या मासेमारी व्यवसायातून देशाला मोठे परकिय चलन मिळते. एकट्या महाराष्ट्रात जवळ जवळ 4लाख 68 हजार मेट्रीक टन मासळी पकडली जाते. उरण तालुक्यात देखिल मच्छिमारांची संख्या लक्षणीय आहे. करंजा, मोरा, दिघोडे, हनुमान कोळीवाडा, आवरे या गावातील अनेक लोक खोल समुद्रात जाउन मच्छिमारी करतात.  देशाच्या विकासाला महत्वाचा हातभार लावणाऱ्या या दर्याच्या राजा हा नेहमी उपेक्षीतांचे जीणे जगत असतो. शासनाने या कोळी बांधवांसाठी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी त्यांचा प्रत्यक्ष फायदा मिळण्यास खूप वेळ जातो. मच्छिमारांना शासनाने देउ केलेला डीझेलचा परतावा प्रत्यक्षात वर्षानुवर्षे मिळत नाही. त्यातच परदेशातील आणि परराज्यातील मासेमारांचे अतिक्रमण ही  आत्ता महाराष्ट्राच्या मच्छिमारांसाठी मोठी समस्या झाली आहे.

उरण तालुक्यातील करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा, शेवा, नागाव, दिघोडे, आवरे, कोप्रोली, खोपटे, वशेणी आदी गावातील हजारो लोक मासेमारीचा व्यवसाय करतात. करंजा, मोरा, हनुमान कोळीवाडा या गावातील लोकांचे तर मासेमारीच उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे उरण तालुक्यात मच्छिमार नौकांची संख्या लक्षणीय आहे. या सर्व नौका सध्या मोरा, करंजा, दिघोडा या बंदरावर शाकारून ठेवल्या आहेत.


 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

युवासेनामुळे हेदोरावाडी पाड्यातील वीज आणि पाणी समस्या दूर