महाविद्यालयांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
ठाणे :- शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टल दिनांक 14 डिसेंबर 2021 पासून कार्यन्वित झाले असून http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, बलभीम शिंदे यांनी केले आहे.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना अंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातीलविद्यार्थ्यासाठी भारत सरकार शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परीक्षा फी या योजनांचा ऑनलाइन प्रणाली मधून लाभ दिला जातो. शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून जिल्ह्यातील सर्व अनुदानित व विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांनी (इयत्ता 11वी व 12वी) महाडीबीटी वरील संकेतस्थळावर महाविद्यालयाची नोंदणी करून घ्यावी, व एकही मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सन 2018-19 पासून महाडीबीटी या संकेतस्थळामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ व वरीष्ठ अभ्यासक्रमाच्या तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक महाविद्यालयांनी महाडीबीटी प्रणालीवर तात्काळ विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणी करून घ्यावेत.
शैक्षणिक वर्ष 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इमाव बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती व फ्रिशीप योजनांकरिता आपले ऑनलाईन अर्ज नोंदणीकृत करावेत. सदर अर्ज आपल्या संबंधित महाविद्यालयाकडून तपासून व पडताळणी करून सहायक आयुक्त, समाज कल्याण, ठाणे यांच्याकडे मान्यतेस्तव सादर करावेत. महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडून पडताळणी केल्यानंतर ऑनलाईन मान्यता देण्यात येईल. सदर योजनांसाठी अर्ज करावयाची अंतिम मुदत ही 31 जानेवारी 2022 आहे. याची ठाणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी नोंद घ्यावी. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण ठाणे, बलभीम शिंदे यांनी कळविले आहे.