विधवा/विधुर-पुनर्विवाह आणि अपेक्षा
विधवा, घटस्फोटीता पुनर्विवाह ही दुर्देवाने ओढवलेल्या परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याचा केवळ एक मार्ग आहे, पण ‘अत्यावश्यकच’ असा मार्ग नाही. कारण अध्र्या वयातून नवीन जीवनाला सुरुवात करणं खूप कठीण असतं, म्हणून तिथे अपेक्षा कमी आणि वास्तवाचं भान असणं अधिक गरजेचं आहे.
परवाच माझी एक जुनी विद्यार्थिनी सहज भेटायला म्हणून घरी आली होती. वयापेक्षा ती अधिकच प्रौढ दिसू लागली होती. बराच वेळ बसली, बोलली आणि सांगू लागली, लग्नाला वर्षही झालं नव्हतं मॅडम. अकराच महिन्यात हे ॲक्सिडेंटमधे गेले, तेव्हा मी सात महिन्यांची गरोदर होते. आता मुलगा सात वर्षांचा आहे. इतके दिवस तर काही वाटलं नव्हतं मला, पण आता जीवनसाथी असायला हवा असं वाटतं.
भावाचं लग्न झालं तेव्हापासून कटकटी सुरू झाल्या माहेरी. आता आईवडीलांनाही मी भार वाटतेय. नवरा मेला, तेव्हाच सासरच्यांनी सर्व संबंध तोडले होते. अगदी नातवाचं ताेंडही पाहिलं नाही त्यांनी. आईवडीलांचं घर सोडावं म्हणते, तर आर्थिकतेचा प्रश्न आ वासून आहेच. पुनर्विवाहाचे प्रस्ताव आले, पण माझ्या मुलाला स्विकारायला नको म्हणतात. आई-वडील किंवा सासरचे मुलाला सांभाळायला तयार नाहीत आणि मी सुद्धा आई आहे ना, मुलाला कसं टाकून देणार. मी तर समोरच्या व्यक्तीचा संसार, मुलं स्विकारणार आहे ना, मग त्यांना माझा मुलगा का नको.? सत्तावीस वर्षांची एक अल्लड विधवा तिचं मन मोकळं करत होती.
कॉलनीतच साडी विक्रीचा व्यवसाय करणारी एक महिला राहते. तीसुद्धा विधवाच आहे. खूप जास्त वय नाही आहे तिचं. असेल जेमतेम तीस एक वर्षांची. मुलबाळ नाही. एकदा सहज तिला विचारलं, ताई, तुम्ही दुसरं लग्न का करत नाही? मुलबाळ तर नाही तुम्हाला. वयही खूप जास्त नाही. शिवाय दिसायला अजूनही चांगल्या आहात, मग दुसरं लग्न करायला अडचण काय आहे..? ती शांतपणे म्हणाली, अहो ताई, तुमचं सगळंं खरं आहे, पण पुनर्विवाहात लोकं खूप अटी ठेवतात. जी स्थळं आली त्यात विधुर लोकच जास्त. वयात पंधरा-वीस वर्षांचं अंतर. मी त्यांच्या घरातील सगळं करणार, पण मला मुलं होवू द्यायची नाही, ही अट कायम. मी फक्त त्यांच्या मुलांचं करायच. मुलं लहान असतील तर ते शक्य होईलही, पण आधीच जी मुलं अठरा एकोणीस वर्षाची, ती माझा ‘आई’ म्हणुन कसा स्विकार करणार?. त्यात लग्न झाल्यानंतर दोन वर्षांर्पयंत ते माझी वागणुक बघतील, आणि मग मला त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी म्हणून मान्यता देतील. पण मग या दोन वर्षांत मुलांनी नाही स्विकारले, किंवा माझ्याकडुन काही चुकले, जर मला त्यांनी घटस्फोट दिला, किंवा दुर्दैवाने याही नवऱ्याला काही झाले, तर मी पुन्हा वाऱ्यावर का?
तिचा उलट प्रश्न ऐकून मी पुन्हा शांत.
अगदी परवा परवाच नात्यातील एका मामीचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि हळूच म्हणाल्या, अगं माझ्या माहेरमधे एक मुलगा आहे. चांगल्या नोकरीला आहे. वय जवळपास पन्नास असेल कदाचित. सात आठ वर्षे झाली, बायको वारली त्याची. दोन मुलं आहेत. मोठी मुलगी कॉलेजच्या तिसऱ्या वर्गात आणि लहान मुलगा बारावीत. घरात कशाचीही कमतरता नाही. सगळं चांगलं आहे. स्वतःची दोन घरं आहेत. तीशी पस्तीशीच्या जवळपास कुणी विधवा, घटस्फोटीता असेल तर बघ. आणि हो, तिला मुलबाळ अजिबात नको बरं का.. सुशिक्षित पाहिजे. नोकरी वगैरे असेल तर उत्तमच. आणि हो, जरा तिच्या माहेरचंही चांगलं पाहिजे. सुंदर हवी, अजून बाकी कशाचीच अपेक्षा नाही त्यांना.
मामीच्या माफक अपेक्षा ऐकून मी फक्त ‘बरं’ म्हटलं आणि फोन ठेवला, पण काही केल्या मामीचं बोलणं डोक्यातून जात नव्हतं.
आजही विधवा पुनर्विवाहासाठी किती अटी ठेवलेल्या आहेत समाजाने. जणुकाही वैधव्य संबंधित स्त्रीने स्वेच्छेने मागून घतलंय. आजही विधवा पुनर्विवाह हा विषय जेव्हा निघतो तेव्हा विधुर अथवा घटस्फोटीत पुरुषांची पहिली अट हीच की ‘संबंधित स्त्रीला मुलबाळ नको.’ तिने फक्त दुसऱ्या नवऱ्याच्या मुलांना आणि घराला सांभाळायचं. जर विधवा स्त्रीकडून अशी अपेक्षा केली जाते तर पुरुष संबंधित स्त्रिचे अपत्य का स्विकारु शकत नाही ...? हा खरोखरच आजही विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
बऱ्याच वेळा विधुर, अथवा घटस्फोटीत पुरुष हे वयाने बरेच मोठे असतात, तरीही त्यांना कमी वयाची विधवा किंवा घटस्फोटीत हवी पुनर्विवाहासाठी. अविवाहित मिळाली तरी त्यांची ना नाही. शिवाय सुसंस्कृत, सुशिक्षित हे जरी मान्य असले तरीही नोकरी करणारी आणि माहेरची परिस्थिती चांगली असणारी, ही बाब मुळीच मनाला पटत नाही. कारण नोकरी करणारी जर विधवा असेल तर आर्थिकदृष्ट्या ती सबळ असल्याने पुनर्विवाहास तयार होईलच असे नाही, आणि जिच्या माहेरची आर्थिक सुबत्ता आहे तीदेखील पुनर्विवाह करण्यास उत्सुक असेल का, हा देखील एक प्रश्न आहेच. पुनर्विवाहाबाबत जितक्या अटी स्त्रियांसाठी ठेवल्या जातात तितक्या पुरुषांसाठी नसतात. आजही समाजात ही असमानता दिसून येते. ‘विधवा, घटस्फोटीता पुनर्विवाह’ ही दुर्देवाने ओढवलेल्या परिस्थितीवर मात करून जीवन जगण्याचा केवळ एक मार्ग आहे, पण ‘अत्यावश्यकच’ असा मार्ग नाही. कारण अध्र्या वयातून नवीन जीवनाला सुरुवात करणं खूप कठीण असतं, म्हणून तिथे अपेक्षा कमी आणि वास्तवाचं भान असणं अधिक गरजेचं आहे.
पण आजही हे भयाण वास्तव आणि अपेक्षांचं ओझं फक्त स्त्रियांसाठी आहे हेही नाकारुन चालणार नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्त्रिचं आर्थिक परावलंबित्व. जर प्रत्येक घरामधून ‘भविष्यात काही अघटीत घटना घडून त्याचे
विपरीत परिणाम आपल्या मुलीला भोगावे लागू नये’ असा विचार झाला तर नक्कीच स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाला अग्रक्रम येईल आणि पुनर्विवाहात स्त्रियांसाठी ज्या जाचक अटी आहेत त्या काही प्रमाणात कमी होवून पुन्हा नव्या जीवनाला यशस्वीपणे सुरुवात होईल.