बेफिकिरीचे परिणाम...

महाराष्ट्र राज्यातील वाढती कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार तर्फे १४ एप्रिल पासून जमावबंदी त्यानंतर संचारबंदी आणि कडक र्निबंध लादण्यात आले असले तरी बहुतांशी शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही. तसेच मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी होत नाही. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय कोणालाही फिरता येणार नाही, असे स्पष्ट शासकीय आदेश असताना देखील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली शासन आदेशाची पायमल्ली करत संचारबंदीत मुक्तसंचार करत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणे आणि अत्यावश्यक सेवेतील साहित्य खरेदी अशी कारणे विनाकारण फिरण्यासाठी पुढे करण्यात येत आहेत. नवी मुंबई शहरातील अनेक दुकानदार संचारबंदी मध्ये अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दुकाने उघडी ठेवत आहेत. अनेक दुकानदार दुकानाच्या नावाची पाटी बदलून शासकीय यंत्रणांनाच चकवा देत आहेत. शासनाने काढलेल्या आदेशाबाबत सुस्पष्टता नसल्याने अनेक दुकानदार शासकीय आदेशातून पळवाट काढत आपली दुकाने सुरु ठेवत आहेत. शासन आदेशाबाबत महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्यात समन्वय नसल्याची बाब देखील संचारबंदी मध्ये समोर येत आहे. महापालिकेचे भरारी पथक शहरात नागरिक आणि दुकानदारांवर कारवाई करत आहे. परंतु, या पथकाकडे मर्यादित कार्यवाहीचे अधिकार असल्याचे दुकानदारांचे फावत आहे. शहरात १४४ कलम लागू केल्यानंतर त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे दायित्व पोलीस प्रशासनाकडे असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरात नाकानाक्यावर पोलीस दिसत असले तरी र्निबंधांचा धाक नसल्याने शहरातील काही भागात दुचाकीस्वार बिना मास्क देखील फिरत असल्याचे चित्र दिसत आहे. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा आणि दुकाने वगळता अन्य व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरात केवळ कपडे, सोने-चांदी, हार्डवेअर आणि मद्य दुकाने वगळता सर्व प्रकाराची दुकाने तसेच खाद्यपदार्थ विक्री दुकाने आणि टपरी उघडी राहत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. याशिवाय भाजीपाला आणि फळे विक्रेते यांना विक्री करता परवानगी देण्यात असल्याने नेहमी प्रमाणे बाजारात वर्दळ असते. विशेष म्हणजे अनेक भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांच्या ताेंडावरचा मास्क देखील गायब असल्याचे चित्र दिसते. शहरात दररोज होणारी विक्रमी रुग्णवाढ, आवश्यक इंजेक्शनचा अभाव, ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि रुग्णालयांत बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची चाललेली धडपड, त्यात कोविड सेंटर्समध्ये उपचार घत असलेल्या रुग्णांचे सुरु असलेले हाल, या पार्श्वभूमीवर शहरवासियांची बेफिकिरी मोठ्या संकटाला आमंत्रण देणारीच आहे. नागरिक संचारबंदी असताना पोलिसांची दिशाभूल करुन करीत असलेला मुक्त संचार म्हणजे ‘कोरोना’ला आमंत्रणच आहे. नागरिकांच्या बेफिकिरी, बेजबाबदारपणामुळेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांचा बेजबाबदारपणाच कडक र्निबंध लागू होण्यास कारणीभूत आहे. 

Read Previous

 ‘कोरोना रुग्णांचे हाल’ 

Read Next

 फायर ऑडीट आवश्यकच...