सिडकोचे नियोजन; महामुंबईला जोडणाऱ्या आणखी दोन मार्गाचा आराखडा तयार असून शासनाकडून निधीची अपेक्षा

नवी मुंबई : गेली सात वर्षे मेट्रो सुरू करण्याच्या केवळ तारखा जाहीर करणाऱ्या सिडकोने आता नवी मुंबई मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने कंबर कसली आहे. बेलापूर ते पेंदार या अकरा किलोमीटर अंतराच्या पहिल्या प्रकल्पातील सेंट्रल पार्क ते पेंदार हा पाच किलोमीटर लांबीचा मार्ग येत्या डिसेंबरपर्यंत सुरू करण्याची तयारी केली आहे.

त्यासाठी भारतीय रेल्वेच्या आरडीएसओच्या पथकाने पहिली चाचणी पूर्ण केली आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा आयुक्तांलयाच्या तपासणीनंतर हा पहिला टप्पा डिसेंबरअखेर सुरू होणार आहे. तर दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू करणार आहे. हा मार्ग मार्गी लागत असल्याने सिडकोने महामुंबईला जोडणारे आणखी दोन मार्गाचा आराखडा तयार केला असून राज्य शासनाकडून आर्थिक निधीची अपेक्षा केला आहे. त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शासनाच्या मान्यतेनंतर या दोन मार्गाचे देखील काम सुरू होणार आहे.

महामुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी सिडकोने पाच मोठे विस्तारित मार्ग निश्चित केले आहेत. त्यातील बेलापूर, तळोजा, कळंबोली, खांदेश्वर आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ असा २५ किलोमीटर अंतराचा एक रिंग रुट मार्ग आहे. या मार्गातील बेलापूर ते पेंदार या ११ किलोमीटर मार्गाचे काम मे २०११ रोजी हाती घेण्यात आले. मात्र पहिल्या चार वर्षांत पूर्ण होणारा हा मार्ग सात वर्षे रखडला आहे. त्याला आता चालना मिळाली असून या मार्गतील सेंट्रल पार्क ते तळोजा या पाच किलोमीटर लांबीच्या मार्गाची नुकतीच ऑसोलिशन व इमरजन्सी ब्रेक चाचण्या पूर्ण झालेल्या आहेत. तळोजा एमआयडीसी ही देशातील एक मोठी औद्योगिक वसाहत आहे. तेथील कामगार आणि उद्योजकांच्या सोयीसाठी हा मार्ग पहिल्यांदा पूर्ण केला जात असून हा मार्ग येत्या तीन महिन्यांत सुरू करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत ही मेट्रो सुरू करण्याची श्रेय घेता यावे यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. त्यामुळे गेली सात वर्षे रखडलेली मेट्रो सुरू करण्याचे काम आघाडीच्या खात्यावर जाणार आहे. हे काम राज्याच्या महामेट्रोला दिल्यापासून त्याला वेग आला असून व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी या कामात अधिक लक्ष घातले आहे. त्यामुळे डिसेंबर पर्यंत पहिला टप्पा आणि पुढील वर्षां अखेपर्यंत या पहिल्या प्रकल्पातील दुसरा टप्पा बेलापूर ते सेंट्रल पार्क पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या मेट्रो प्रकल्पातील दोन टप्यात हा मार्ग सुरू होणार असून यामुळे महामुंबईच्या विकासाला अधिक गती येणार आहे.

Read Previous

मराठा आराक्षण रद्द केल्याने मराठा समाज आक्रमक

Read Next

नेरूळला इंटकची  केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने