वाशीत अनधिकृत फेरीवाल्यांची दादागिरी वाढली
नवी मुंबई-: वाशी विभागात अतिक्रमण विभागाच्या आशिर्वादाने शहराबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांचे बस्तान वाढले असुन आता सदर फेरील्यांची दादागिरी देखील वाढू लागली असल्याने थेट मनपाच्या सुरक्षा रक्षकांवरच धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत. बुधवारी एका फेरवाल्याने आपल्या साथीदारांसह सुरक्षा रक्षकाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांना सुरक्षा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे येथे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपा महिला उपयुक्तांच्या हाताची बोटे फेरीवाल्याने छाटल्याची घटना घडली होती.बुधवारी वाशी सेक्टर ९ येथे अरुण बार समोरील पदपथावर लहान मुलांचे कपडे विकणाऱ्या व गोवंडी वरून येणाऱ्या एका अनधिकृत फेरीवाल्याने त्याला व्यवसाय करण्यास मज्जाव करणाऱ्या समाधान पाटील या नवी मुंबई मनपाच्या सुरक्षा रक्षकाला आपल्या इतर तीन साथीदारांसह धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. मात्र सदर सुरक्षा रक्षकाने आपल्या वरिष्ठांना याबाबत कळविल्यानंतर वरिष्ठांनी सुरक्षा रक्षक आणि मारहाण करणारा फेरीवाला यांच्यात समेट घडवून प्रकरण मिटवल्याची चर्चा अधिकृत फेरीवाल्यांमध्ये आहे.तसेच बाहेरून येणाऱ्या या अनधिकृत फेरीवाल्यांच्या या अश्या कृत्यांमुळे परवानाधारक फेरीवाल्यांवर संक्रात येण्याची भीती अधिकृत फेरीवाले व्यक्त करत आहेत.
याआधी देखील वाशी येथे कारवाई करताना चेतन सूर्यवंशी नामक सुरक्षा रक्षकाला एका महिला फेरीवाला विक्रेत्याने अश्लील शिवीगाळ करून हाताचा चावा घेतल्याची घटना घडली होती.त्यामुळे अशा वाढत्या घटनांमूळे सुरक्षा रक्षकांच्याच सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबईतील वाशी विभाग हा सगळ्यात जुना आणि मध्यवर्ती भाग असल्याने या ठिकाणी मोठया प्रमाणात अनधिकृत फेरीवाले वाढत चालले आहेत. मात्र यातील बरेच फेरीवाले हे मानखुर्द ,गोवंडी भागातुन येतात .आणि त्यांच्या कडुन अतिक्रमण विभाग आपले हात गरम करून घेत असल्याने वाशी अतिक्रमण विभाग फक्त दिखाव्याची कारवाई करतात. मात्र वास्तविक परिस्थिती जैसे थे वैसेच राहते.त्यामुळेच या फेरीवाल्यांची दादागिरी वाढत चालली असून सुरक्षा रक्षकांवर धावुन जाण्याचे धाडस करत आहेत.
सदर सुरक्षा रक्षक समाधान पाटील याच्याशी सुरक्षा अधिकारी संतोष पाटील यांनी माझ्यासमोर मोबाईलचा स्पीकर चालू ठेवून बातचीत केली आणि त्याला फेरीवाल्याने मारहाण केली का? याबाबत विचारणा केली असता त्याने याचा इन्कार केला ,उलट आपणच सदर फेरीवाल्याला हुसकावून लावले असल्याचे सांगितले आहे.
महेश हंसशेट्टी,
सहाय्यक आयुक्त/विभाग अधिकारी,वाशी