’कॉपीमुक्त अभियान’प्रभावीपणे राबविण्यासाठी नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग्य नियोजन

नवी मुंबई :  11 फेब्रुवारीपासून 12 वीची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरु झाली असून 18 मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षा तसेच 10 वीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीत पार पाडण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने संपूर्ण तयारी केली असून त्या अनुषंगाने मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या विशेष बैठकीत परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार घडणार नाही याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मौलिक सूचना करीत निर्देश दिले. या दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व ना.अजित पवार, शिक्षणमंत्री ना.दादा भुसे यांनीही मार्गदर्शन केले.

या बैठकीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महापालिका शिक्षण विभागास 12 वीच्या परीक्षा सुरळीतपणे पार पडण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांची नियुक्ती केली असून त्यांच्यासह शिक्षणाधिकारी व केंद्र समन्वयक अधिकारी यांनी विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करण्याचे निर्देशित केले आहे. कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत 3 भरारी पथके व 2 बैठया पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये 15अधिकारी,कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सर्व परीक्षा केंद्रांवर पिण्याचे स्वच्छ व शुध्द पाणी, स्वच्छतागृह व्यवस्था, पंखे, लाईट आदी भौतिक सुविधा असण्याबाबत खातरजमा करुन घ्यावी व त्या उपलब्ध असण्याबाबत दक्षता घ्यावी असे आयुक्तांनी सूचित केले.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या 30 ठिकाणच्या परीक्षा केंद्रांमध्ये 16,496 विदयार्थी हे 12 वीची परीक्षा देत आहेत. यापैकी नवी मुंबई महानगरपालिकेच्या दोन शाळांमध्ये परीक्षा केंद्रे असून त्याठिकाणी 361 विदयार्थी 12 वीची परीक्षा देत आहेत.

नवी मुंबई महालिका क्षेत्रात एकही केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर नाही. तरीही सर्व परीक्षा केंद्रांवर आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करतानाच केंद्रांच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही कार्यान्वित असल्याची खात्री करुन घ्यावी व त्याचे छायाचित्रीकरण रेकॉर्डींग जतन राहील याची दक्षता घ्यावी असे आयुक्तांनी निर्देशित केले. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात परीक्षेशी संबंधित नसलेले कोणीही उपस्थित नसेल, याबाबतही खबरदारी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून येतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून यामध्ये दोषी आढळणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले आहे. या बाबीची संबंधितांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे. 12 वीच्या परीक्षांप्रमाणेच 10 वीच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षा कालावधीतही ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.  

परीक्षा कालावधीत नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या एनएमएमटी बसेस वेळेवर धावतील याची काळजी घेण्याचे निर्देश परिवहन व्यवस्थापकांना देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनासही गाडया वेळेवर उपलब्ध असतील याची दक्षता घेण्याचे पत्राव्दारे सूचित करण्यात येत आहे.

विदयार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेच्या 1 तास आधी आपापल्या परीक्षा केंद्रांवर हॉल तिकीटासह उपस्थित राहण्याची दक्षता घ्यावी व सोबत शक्य झाल्यास ओळखपत्रही ठेवावे आणि परीक्षा कॉपीमुक्त पारदर्शक रितीने पार पडतील याची काळजी घेऊन परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावे असे आवाहन विदयार्थ्यांना करतानाच नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी 12 वीच्या परीक्षेत उत्तम गुण संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या कालावधीत कुठेही गैरप्रकार आढळल्यास अथवा तक्रार करावयाची असल्यास शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे यांच्याशी 022-27567067 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका आयुक्तांचा शाळा दौरा