भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील ‘मेट्रो मार्ग-९'चे काम जलदगतीने सुरु असून ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या कामाची दोन टप्प्यात विभागणी करण्यात आली असून डिसेंबर २०२५ मध्ये मेट्रो रेल्वे सेवा सुरु होणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी दिली.
‘मिरा-भाईंदर मेट्रो'च्या कामाचा आढावा घेण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ६ फेब्रुवारी रोजी महापालिका मुख्यालयात विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याबाबत आणि भविष्यातील योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ‘एमएमआरडीए'चे आयुक्त संजय मुखर्जी, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, महापालिका आयुक्त संजय काटकर, आदि उपस्थित होते. यावेळी दहिसर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० पैकी ३ मार्गिका या अवजड वाहनांसाठी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर बैठकीत शहराच्या विकासाला गती देण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना वेग देण्याबाबत आणि भविष्यातील योजनांची अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. रस्ते, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ठोस उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती आयुक्त संजय काटकर यांनी दिली. मिरा-भाईंदर शहरात ‘दहिसर-भाईंदर मेट्रो मार्गिका-९' तयार करण्यात येत आहे. कंत्राटदाराला देखील काम पूर्ण करण्यासाठी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रकल्पातील स्थापत्य काम ८७ टक्के पूर्ण झाले असून मेट्रो स्थानक आणि मार्गिकेचे काम पूर्ण केले जात आहे.
‘मेट्रो मार्गिका-९'चे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. दहिसर ते सुभाषचंद्र बोस पर्यंत टप्पा-१ आणि पुढील टप्प्यात उत्तन पर्यंत ‘मेट्रो'चा विस्तार केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात मेट्रो मार्ग आणि कारशेडचे काम केले जाणार आहे. मेट्रो मार्गिकेच्या मूळ मार्गांवर स्थानिक नागरिकांची घरे बाधित होत असल्याने स्थानिकांचा विरोध आहे. त्यावर पुढील महिन्यात ‘एमएमआरडीए'च्या कार्यालयात बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती ना. प्रताप सरनाईक यांनी दिली. मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य मार्गांवर मेट्रो रेल्वे खाली ३ उड्डाणपुल तयार करण्यात येत आहे. यातील अन्य २ पुलाचे काम केले जात असून दुसऱ्या पुलाचे लोकार्पण येत्या १९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे, असे ना. सरनाईक म्हणाले.
दरम्यान, मिरा-भाईंदर शहराचा शाश्वत विकास करण्यासाठी महापालिका मार्फत विविध विकास कामे सुरु आहेत. यात घोडबंदर किल्ला ते शिवसृष्टी रस्त्याचे काम पूर्ण करण्याच्या कामास गती देण्यात येत आहे. तसेच रस्त्यातील बाधितांचे पुनर्वसन लगतच्याच परिसरात करण्याचे आश्वासन ना. प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. यासह महिलांसाठी प्रसाधनगृहे, सॅनिटरी नॅपकीनची सुविधा, स्तनपानाकरिता हिरकणी कक्ष आदि सुविधा उभारण्यात येत आहे. तसेच शहरात ‘ट्रॅफिक पार्क'ची निर्मिती करण्यात येणार आहे. या ‘पार्क'मुळे लहान मुलांमध्ये वाहतुकीबाबत जनजागृती होईल.