डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचविण्याची मागणी

नवी मुंबई : ३० एकर डीपीएस फ्लेमिंगो तलावाला संवर्धन राखीव म्हणून वाचवण्यासाठी, २ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ जागा दिनानिमित्त मोठ्या संख्येने पर्यावरणप्रेमींनी जलाशयाजवळ मूक मानवी साखळी तयार केली.

आमचा संदेश  मोठ्या आणि आणि स्पष्ट आहे, सदर पाणथळ जागा त्वरित स्वच्छ केली पाहिजे. भरती-ओहोटीतील पाण्याचा प्रवाह पूर्ववत केला पाहिजे, असे ‘नॅटकनेक्ट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लि. (एनएमआयएएल) प्रकल्पाच्या परिसरातील जैवविविधता वाचवण्यासाठी वचनबध्द असूनही, डीपीएस फ्लेमिंगो तलावासारख्या पाणथळ जागा जाणूनबुजून नष्ट केल्या जात आहेत, असे कुमार म्हणाले.

यावेळी कार्यकर्त्यांनी धरलेल्या फलकांवर ‘पाणथळ जागा पडीक नाहीत; निसर्गाचे सौंदर्य नष्ट करु नका, फ्लेमिंगो घरे वाचवा - आमची पाणथळ जागा, निसर्गाचे रक्षण करा - ते तुमचे रक्षण करेल, गुलाबी तलाव लाल करु नका', असे संदेश होते. तसेच फ्लेमिंगो सिटीमध्ये फ्लेमिंगो बेघर मानवी साखळीत सहभागी झालेले माजी आमदार संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. पर्यावरणाच्या या विनाशाकडे मी मूक प्रेक्षक बनून राहू शकत नाही, असे नाईक म्हणाले.

अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, रोटरी क्लबच्या सदस्या आणि स्थानिक महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थी मानवी साखळीत सामील झाले आणि तलावावर मोर्चात सहभागी झाले. तलावाजवळून जाणाऱ्या अनेक पक्षीप्रेमींनी थांबून कार्यकर्त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

दरम्यान, शहराच्या जैवविविधतेचा भाग म्हणून डीपीएस फ्लेमिंगो तलाव वाचवण्याची गरज पटवून देण्यासाठी पर्यावरणवाद्यांचे एक शिष्टमंडळ वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आंतरभरतीसंबंधी पाणथळ जागा संरक्षित आहेत आणि भरती-ओहोटीच्या रेषेपर्यंतचा परिसर जतन आणि संवर्धन केला पाहिजे. राज्य वन मंत्रालयाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या निर्णयानुसार सदर पाणथळ जागेला संवर्धन राखीव म्हणून घोषित करण्यात आले आहे.
-बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

डीपीएस तलावाचे पुनर्संचयित आणि संवर्धन राखीव म्हणून देखभाल करण्यासाठी मंच आपल्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करेल.
-संदीप सरीन, कार्यकर्ता-नवी मुंबई पर्यावरण संवर्धन सोसायटी. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

टीएस चाणक्य सागरी किनाऱ्यावर लोकसहभागातून विशेष स्वच्छता