‘आरटीई' प्रवेशासाठी मुदतवाढ; २ फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे : ‘आरटीई' अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २ फेब्रुवारी २०२५ रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आणि महापालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११,३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ३१,७०४ अर्ज आले आहेत.

१४ ते २७ जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे बालकांच्या पालकांनी २ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करुन सदर सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

बालकांचा मोफत-सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जाते.

‘आरटीई' अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून  https://student.maharashtra.gov.in/adm_portal या वेबसाईटवर २ फेब्रुवारी पर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदतकेंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे, आदिंबाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

शिक्षण प्रसारक विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात उत्तुंग यश