घणसोली मध्ये सार्वजनिक ठिकाणी डेब्रिज टाकणारी दोन वाहने जप्त

नवी मुंबई : घणसोली महिला सक्षमीकरण केंद्राजवळ डेब्रिज टाकले जात असल्याची तक्रार व्हॉट्‌सॲपवर प्राप्त झाल्यानंतर नवी मुंबई महापालिका उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या निर्देशानुसार महापालिका भरारी पथकाने (परिमंडळ-२) त्वरित कार्यवाही करीत दोन डंपर वाहने जप्त केली आहेत. या वाहन मालकांकडून प्रत्येकी ३० हजार रुपये याप्रमाणे एकूण ६० हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर रहावे याकरिता नागरिकांचे सक्रिय योगदान अपेक्षित असून, नागरिकांनी बांधकाम सुरु असल्यास आपले पाडकाम साहित्य नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी असलेल्या सी ॲन्ड डी वेस्ट प्रकल्प ठिकाणी द्यावे, असे आवाहन नागरिकांना करतानाच, डेब्रिजव्दारे नवी मुंबई शहर विद्रुपीकरण करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्या विरोधात दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे नवी मुंबई महापालिका तर्फे सूचित करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहराचा ‘स्वच्छ आणि सुंदर शहर' लौकिक वाढविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनंदिन स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यासोबतच सार्वजनिक भागात अनधिकृतपणे टाकण्यात येणारा राडारोडा आणि पाडकाम साहित्याचे डेब्रिज टाकले जाऊ नये याकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. याकरिता दोन्ही परिमंडळ निहाय भरारी पथके कार्यान्वित असून, त्यांच्यामार्फत डेब्रिज विरोधी कार्यवाही करण्यात येते. - डॉ. राहुल गेठे, अतिरिक्त आयुक्त (२) - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हळदीकुंकू समारंभात महिला सुरक्षा विषयी पोलिसांचा संवाद