कोपरी गावातील स्मशानभूमीचे काम अंतिम टप्प्यात
वाशी : कोपरी गावातील बहुउद्देशीय इमारत बांधकाम प्रस्तावातील ‘स्मशानभूमी परिसर' या शब्दामुळे घोळ निर्माण झाला होता. मात्र, आता स्मशानभूमीचा भूखंड स्वतंत्र करण्यात आला असून, कोपरी गावातील नवीन स्मशानभूमीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसरीकडे आता कोपरी गावात उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच बहुउद्देशीय इमारत आकार घेणार आहे, अशी माहिती माजी नगरसेविका सौ. उषाताई भोईर यांनी दिली.
कोपरी गावात स्मशानभूमी लगतच्या जागेत बहुउद्देशीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव माजी नगरसेविका सौ. उषाताई भोईर यांनी २०१८ साली नवी मुंबई महापालिका महासभेत मांडला होता. मात्र, सदर प्रस्तावात ‘स्मशानभूमीी परिसरात' इमारत बांधणे असा उल्लेख छापल्याने कोपरी गावातील पुरातन स्मशानभूमी हटवली जाणार, असे वातावरण तयार झाले होते. यावर मार्ग काढण्यासाठी कोपरी गाव ग्रामस्थ मंडळाने तात्काळ बैठक बोलावून स्मशानभूमी असलेल्या जागेतच ठेवून महापालिकेने नवीन स्मशानभूमी बांधून द्यावी, असा ठराव एकमताने मंजूर केला. या ठरावाला माजी नगरसेविका सौ. उषाताई भोईर यांनी देखील हात उंचावून आपला पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर कोपरी गाव ग्रामस्थ मंडळाने केलेल्या मागणीचा माजी नगरसेविका सौ. उषाताई भोईर यांनी तात्कालिन आमदार गणेश नाईक यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु ठेवला होता. या पाठपुराव्याला यश येऊन तत्कालिन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर कोपरी गावात स्मशानभूमी उभारणीचे काम सुरु होऊन पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे आता कोपरी गावातील स्मशानभूमीचा भूखंड पूर्णपणे वेगळा झाला असून, नवीन बहुउद्देशीय इमारतीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे माजी नगरसेविका सौ. उषाताई भाईर यांनी सांगितले.
कोपरी गावातील स्मशानभूमीत अद्ययावत धुरांडे
कोपरी गावातील नवीन स्मशानभूमी उभारणीचे काम अंतिम टप्यात आहे. स्मशानभूमीमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मोठ्या प्रमाणात निर्माण होणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका तसेच वायू प्रदूषण होऊ नये याकरिता कोपरी गावातील स्मशानभूमीत आता अद्ययावत चीमनी बसवण्यात येणार आहे.यासाठी माजी स्थानिक नगरसेविका सौ. उषाताई भोईर यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.
कोपरी गावातील नवीन स्मशानभूमी नजिक आता लोकवस्ती वाढली आहे. त्यामुळे महाराष्र्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार धुरामुळे वायू प्रदूषण होऊन आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून कोपरी गावातील नवीन स्मशानभूमीत अद्ययावत धुरांडे बसवण्यात येणार आहे. - सौ. उषाताई भोईर, माजी स्थानिक नगरसेविका - कोपरी गाव.