कर थकबाकीदारांनो, सावधान तुमच्याकडे वाजणार बॅन्ड
थकबाकीदारांच्या घर-दुकानासमोर बॅन्डबाजा वाजवून सूचना; वसुलीत वाढ
ठाणे : ठाणे महापालिकेच्या विविध करांचा भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांविरोधात महापालिका ॲवशन मोडवर आली आहे. वारंवार सूचना दिल्यानंतर आणि वारंवार नोटिसा तसेच सुविधा दिल्यानंतरही कराचा भरणा न करणाऱ्या ठाणेकरांच्या घरी पोहोचून त्यांची बॅण्डबाजा वाजवून वरात काढण्याचा नवीन नाही; पण जुन्याच फंड्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत किमान कर थकबाकीच्या १० टक्के रक्कमेचा भरणा झाल्याची सुत्रांची माहिती आहे.
ठाणे महापालिकेच्या तिजोरीत कराचा भरणा विशेष अंमलबजावणीने वाढल्याने आता वसुलीच्या रक्कमेत कमालीची वाढ होत, वसुली ६०० कोटी १० लाखाच्या आसपास पोहोचल्याची अधिकृत माहिती उपलब्ध आहे. ठाणे महापालिका मालमत्ता कर विभागाला उद्दिष्ट गाठण्यासाठी ३१ मार्च पर्यंत अवघ्या अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रभावी अंमलबजावणीस प्रभाग समितीनिहाय उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनी सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे जांभळीनाका परिसरातील बाजारपेठेत अनेकांच्या दुकानांसमोर बॅन्डबाजा, ढोलताशा घेऊन महापालिकेचे पथक दाखल झाले होते. ज्या आस्थापनांची थकबाकी १० लाखांच्या वर असेल अशा आस्थापनांविरोधात ढोलताशा वाजविण्याची शक्कल महापालिकेने लढविली आहे.
महापालिकेचे यंदा ८५० कोटींचे उद्दिष्ट...
ठाणे महापालिकाकडून कर थकबाकीदारांना वारंवार अलर्ट करण्यात आलेले आहे. त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या माध्यमातून उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे बाजारपेठेत असलेल्या विविध आस्थापनांच्या ठिकाणी ढोलताशा वाजवून त्यांनी मालमत्ता कराचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले होते. यामुळे मालमत्ता कराची थकबाकी भरणाऱ्यांमध्ये १० टक्क्याने वाढ झाली आहे. २० जानेवारीपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी ६०० कोटी १० लाखाची रक्कम जमा झाली आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात ठाणे महापालिकेचे मालमत्ता कराच्या माध्यमातून ८५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट आहे.
ढोलताशावाल्यांना मिळाला रोजगार...
थकबाकीदारांना जागे कारण्यासाठी ठाणे महापालिकेला मात्र ढोलताशे भाड्याने घेऊन कर वसुलीची मोहीम राबवावी लागत आहे. किमान लग्नसराईची वाट पाहणाऱ्या बेन्जो वाजविणाऱ्या वाजंत्रीची मात्र चांगलीच चलती झाली आहे. ठाणे महापालिकेच्या थकबाकीच्या बहाण्याने बॅन्जोवाल्यांना रोजगार मिळाला, अशी प्रतिक्रिया सुज्ञ नागरिक नोंदवित आहेत.