एपीएमसी परिसरात महापालिका पे अँड पार्किंग ठेकेदाराकडून बेकायदेशीर पार्किंग वसुली?
तुर्भे : वाशी-तुर्भे एपीएमसी मार्केट लगतचे काही रस्ते नवी मुंबई महापालिकेने ‘पे अँड पार्किंग'साठी दिलेले नसतानाही पार्किंगची वसुली करणाऱ्या ठेकेदाराकडून या ठिकाणी बेकायदेशीरपणे पार्किंगची वसुली चालू आहे. सदर पार्किंग वसुलीचा आकडा महिन्याला काही लाखांच्या घरात आहे. त्यामुळे सदर पार्किंग वसुली कोणाच्या खिशात जाते याची चौकशी महापालिकेने चालू केली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिका उपायुक्त (मालमत्ता विभाग) भागवत डोईफोडे यांनी दिली.
वाशी-तुर्भे येथील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) परिसरात पाच बाजारपेठा आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून एपीएमसी मार्केट ओळखले जाते.या ठिकाणी दररोज राज्यातून आणि परराज्यातून हजारो वाहनांची ये-जा असते.
त्यामुळे या परिसरात नेहमीच अवजड वाहतुकीची वर्दळ असल्याचे चित्र दिसते. या एपीएमसी मार्केट मधील पाचही बाजारपेठांच्या सभोवतालचे काही रस्ते नवी मुंबई महापालिकेने ‘पे अँड पार्क'साठी ठेकेदाराला दिले आहेत. तुर्भे सेक्टर-२० येथून दक्षिणमुखी हनुमान मंदिराकडे येणाऱ्या मार्गावर (बीएआरसी) भाभा अणुसंशोधन केंद्राचा एक प्रकल्प आहे. त्यामुळे महापालिकेने या रस्त्यावर पार्किंगचा ठेका दिला नसतानाही या ठिकाणी भाजी आणि फळ मार्केट मधील मालाच्या रिकाम्या गाड्या पार्किंग करुन ठेवलेल्या असतात. या ठिकाणी जबरदस्तीने वाहन चालकांकडून १२ तासाला २०० रुपये पार्किंग शुल्क उकळले जाते. दिवसा २४ तासात शेकडो गाड्या ये- जा करत असतात. तसेच पार्किंगचे पैसे न दिल्यास या ठेकेदाराची मुले रात्री गाड्यांच्या टायरची हवा सोडून देणे, ट्रकच्या काचा फोडून चालकांचे मोबाईल, पैसे चोरुन नेणे, प्रसंगी पार्किंगचे पैसे न दिल्यास चालकाला मारहाण करणे असे प्रकार या ठिकाणी घडत आहेत.