‘महानगर गॅस'च्या खोदकामामुळे रस्त्यांची दुरावस्था
नवीन पनवेल : ‘महानगर गॅस'च्या पाईपलाईनसाठी नवीन पनवेल शहरातील ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. या खोदकामामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे.
नवीन पनवेल शहरातील रस्ते दरवर्षी काही ना काही कारणांमुळे खोदण्यात येतात. याचा त्रास वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागतो. डिसेंबर महिन्यापासून नवीन पनवेल मधील अंतर्गत रस्ते महानगर गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांना खड्डे पडलेले तर आहेतच; शिवाय वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. काही ठिकाणी २ गाड्या जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. मात्र, वाहतूक पोलीस कुठेही निदर्शनास येत नाहीत.
सेक्टर-२, ३, ४, आदई सर्कल जवळ रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत, तर काही ठिकाणी काम पूर्ण करुन केवळ माती टाकण्यात आली. यावरुन दुचाकी घसरत देखील आहेत. त्यामुळे लवकरात लवकर सदरचे काम पूर्ण करून रस्ते पूर्ववत करून द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.