महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
नवी मुंबईत अपघातांची मालिका सुरु
नवी मुंबई : २०२५ वर्ष सुरु झाल्यापासून नवी मुंबई पोलीस आयुवतालयाच्या हद्दीत अपघातांची मालिका सुरु झाली आहे. या अपघातांमध्ये मागील १२ दिवसांमध्ये ३२ लहान-मोठ्या अपघाताच्या घटना घडल्या असून या अपघातात १३ जणांचा बळी गेला आहे. तसेच यात २५ जण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे २ महाविद्यालयीन तरुणांचा आणि वाशीतील कोपरी गांव येथे २ तरुणींच्या झालेल्या मृत्युच्या घटना अधोरेखीत करण्यासारख्या आहेत. दरम्यान, यातील बहुतेक अपघात वाहन चालकांच्या चुकीमुळे तसेच निष्काळजीपणामुळे घडल्याचे आढळून आले आहेत.
नवीन वर्ष २०२५ धुमधडाक्यात सुरु झाले असताना, नवी मुंबईच्या हद्दीत अपघातांच्या घटनांची मालिका सुरु झाली आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, सीबीडी, पनवेल, उरण, न्हावाशेवा आणि कामोठे या हद्दीमध्ये ५ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. यातील पनवेल, उरण आणि कामोठे येथील अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यात २ जण जखमी झाले आहेत. त्यानंतर ३ जानेवारी रोजी पामबीच मार्गावर वाशी येथे रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. तर ५ जानेवारी रोजी सायन-पनवेल मार्गावर जुईनगर येथे दुपारी घडलेल्या अपघातात पनवेलहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डंपरने ४ वाहनांना धडक दिली होती. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर १ जखमी झाला.
त्यानंतर ६ जानेवारी रोजी खांदेश्वरच्या हद्दीत एकाचा मृत्यू झाला असून त्यापाठोपाठ ७ जानेवारी रोजी सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथे स्कुटीवरुन बेलापूर येथील महाविद्यालयात जाणारे २ महाविद्यालयीन तरुण बसच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ९ जानेवारी रोजी न्हावाशेवा हद्दीत एका व्यक्तीचा तर १० जानेवारी रोजी सायंकाळी नेरुळ येथून स्कुटीवरुन ट्रिपल सीट उरण येथे जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुणांच्या स्कुटीला जासई येथील उड्डाणपुलावर अपघात झाला. या अपघातात स्कुटी चालक तरुणाचा मृत्यू तर तरुणीसह दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
तर ११ जानेवारी रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्यापाठोपाठ १२ जानेवारी रोजी सकाळी वाशीतील कोपरी गांव येथे वाशीतून ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव स्कोडा कारच्या धडकेत स्कुटीवरील २ तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दरम्यान, यातील बहुतेक अपघात वाहन चालकांच्या चुकांमुळे घडल्याचे आढळून आले आहे.