जुहूगांव चौपाटीवरील धारण तलावात शेवाळचे साम्राज्य

वाशी : वाशीतील जुहूगांव चौपाटी येथील धारण तलावात मागील काही दिवसांपासून शेवाळ साचत चालली आहे. या ठिकाणी सकाळ-सायंकाळ चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना शेवाळीच्या दुर्गंधीचा त्रास होत आहे. त्यामुळे सदर शेवाळ काढून तलाव साफ करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

नवी मुंबई शहरातील धारण तलावांची स्वच्छता गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात आलेली नाही. धारण तलावात आलेल्या कांदळवनामुळे गाळ काढण्यात अडचणी येत आहेत. पावसाळ्यात सांडपाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, आता त्यात गाळ साचले आहे. याशिवाय वाशी जुहू चौपाटी याठिकाणी असणाऱ्या धारण तलावाची अवस्था सध्या इतर ठिकाणी असणाऱ्या धारण तलावांसारखीच झाली आहे. इतर ठिकाणी असणाऱ्या धारण तलावांकडे नागरिक जरी फिरकत नसले तरी वाशी मिनी सीशोर मधील सदर धारण तलाव परिसरात नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.

मिनी सीशोर येथे सर्वात मोठा जॉगिंग ट्रॅक असल्याने सकाळ-संध्याकाळ नागरिकांची चालण्यासाठी सर्वाधिक गर्दी असल्याचे पहायला मिळते. मात्र, काही दिवसांपासून या धारण तलावाच्या अस्वच्छतेमुळे कमालीची दुर्गंधी पसरली आहे. धारण तलावातील पाण्यावर हिरव्या शेवाळच्या थर साचला आहे. याशिवाय प्लास्टिकच्या बाटल्या, इतर जैविक कचरा असा एकंदरीत सगळा कचरा धारण तलावात साचला आहे. शेवाळ आणि कचऱ्यामुळे तलावातील पाण्याचा कुबट आणि घाणेरडा दुर्गंध परिसरात पसरला आहे.

नवी मुंबई महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार केला तरी अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले गेले. प्रशासनाने त्वरित धारण तलावाची साफसफाई करावी. वॉकिंग साठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आरोग्य सुदृढ रहावे यासाठी नागरिक याठिकाणी रोज चालण्यासाठी येतात; मात्र इथल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
-विक्रम शिंदे, माजी नगरसेवक, नमुंमपा. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जासई येथे महाआरोग्य शिबिर संपन्न