चिनी मांज्यामुळे गरुड जखमी
ठाणे : पतंगाच्या मांजामुळे शाहिन गरुडाला गंभीर दुखापत झाल्याची घटना ठाणे मधील चंदनवाडी येथे उघडकीस आली आहे. या गरुडाच्या डाव्या पंखाला खोलवर जखम झाली असून ‘वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन'चे रेस्क्यु प्रमुख अभिजीत मोरे यांनी त्याला उपचारार्थ पशुवैद्यकिय दवाखान्यात दाखल केले आहे.
ठाणे पश्चिमेकडील चंदनवाडी येथील चांदीवाला कॉम्प्लेक्समध्ये ११ जानेवारी रोजी पतंगाच्या मांज्यात अडकलेला शाहीन गरुड (बहिरी ससाणा) आढळला. या घटनेची माहिती मिळवाच ‘वाईल्ड वेल्फेअर असोसिएशन'चे रेस्क्यु प्रमुख अभिजीत मोरे यांनी धाव घेत या पक्ष्याची मांजातून सुटका केली. या गरुड पक्ष्याच्या डाव्या पंखाला खोलवर जखम झाली आहे, जी अतिशय तीक्ष्ण मांज्यामुळे झाली असावी. जखमेवर उपचार करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून, दुखापतीची तीव्रता अद्याप निश्चित झालेली नाही.
त्यामुळे सक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्याचा आनंद घेताना पक्ष्यांच्या जीवावर बेतणार नाही, याची दक्षता घ्यावी. काच किंवा धातुने लेपित पतंगाचे धागे (मांजा) पक्ष्यांना गंभीर दुखापत आणि मृत्यू देखील घडवू शकतात. जर अशा प्रकारे जखमी झालेल्या कोणत्याही पक्ष्यांना पाहिले तर कृपया स्थानिक वन विभाग किंवा वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाईन नंबरवर त्याची माहिती द्यावी, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक यांनी केले आहे.
चिनी मांजा विरोधात महापालिकेची मोहीम...
पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा किंवा चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजाच्या वापरावर प्रतिबंध करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण ४५० आस्थापनांची तपासणी करुनही कुणाकडेही चिनी मांजा आढळला नाही. मात्र, सुमारे २९० किलो प्लास्टिक जप्त केले असुन, १३ लाखांचा दंड ठोठावला आहे. चिनी मांजा तयार करण्यासाठी बारीक चुरा केलेली काच, धातू किंवा अन्य तीक्ष्ण पदार्थांचा वापर करण्यात येतो. याचे उत्पादन, विक्री, साठवण आणि वापर यावर ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण'ने निर्बंध घातलेले आहेत. यासंदर्भात नागरिकांनी ८६५७८८७१०१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी.