वायू प्रदुषण कमी करण्यासाठी सखोल स्वच्छता मोहिमांचा उपयोग
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात स्वच्छतामित्र आणि स्वच्छतासखींच्या माध्यमातून नियमित स्वच्छता केली जात असते. तथापि नमुंमपा हद्दीतील सायन-पनवेल महामार्ग, ठाणे-बेलापूर मार्ग, आम्र मार्ग तसेच शहराच्या अंतर्गत भागातील मुख्य रस्ते यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असल्याने आणि त्यातही बांधकाम साहित्य अथवा घनमाती, पाडकाम साहित्य वाहून नेणाऱ्या मोठ्या वाहनांची संख्याही जास्त प्रमाणात असल्याने त्यांच्या कडेला माती साचून राहिल्याचे निदर्शनास आले आहे. येथील साचलेली माती वाहनांच्या वेगामुळे उडून हवेतील धुळीचे प्रमाण वाढते. सदर बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या नियंत्रणाखाली विशेष सखोल स्वच्छता मोहीम अर्थात ‘डीप क्लिनींग ड्राईव्ह' ३० डिसेंबर पासून सुरु करण्यात आले. अगदी रविवारी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळच्या सत्रात सदर मोहीम प्रभावीपणे राबविण्यावर भर देण्यात आला.
महामार्गांप्रमाणेच दुर्लक्षित पडीक जागांवरही स्वच्छता मोहीम प्राधान्याने राबविण्यात आली. त्याकरिता अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली प्रत्येक दिवशी प्रत्येक विभागात कोणत्या भागाची साफसफाई करायची ते निश्चित करण्यात आले. यामध्ये रस्त्यांच्या आणि पदपथांच्या कडेला साचून घट्ट झालेली माती उचलण्याचे निश्चित करण्यात आले. त्यासोबतच अत्याधुनिक फॉगर्स मशीनद्वारे पाणी मारुन रस्त्यांची सफाई देखील केली जात आहे. याकरिता महापालिकेच्या मलप्रक्रिया केंद्रातील शुध्द केलेल्या प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात येत आहे.
या मोहिमेच्या वेळापत्रकानुसार १२ जानेवारी रोजी कोपरखैरणेत घणसोली नाला ते धारण तलाव रस्ता, घणसोली विभागात सेक्टर-११ साईबाबा सर्कल ते भागवत रोड मुख्य रस्ता ते आगरी चौक, दिघा विभागात व्होडाफोन कंपनी, कॉर्नर ते सँडोज कंपनी एमआयडीसी परिसर याठिकाणी बारकाईने सफाई करून घेण्यात आली. त्यासोबतच इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात सदर मोहीम राबविण्यात आली. यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण कमी झाल्याचे अभिप्राय नागरिकांकडूनच प्राप्त होत असून या सखोल स्वच्छता मोहीमा उपयोगी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
दरम्यान, या अंतर्गत रहदारीचे मुख्य रस्ते, त्यांच्या शेजारील पदपथ आणि त्यांच्यामधील दुभाजक यांच्या कडेला साचलेली माती, झाडे-झुडपे काढण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण कमी झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. एकाचवेळी सर्व विभागांत स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविली जात असल्याने सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी रस्त्यांवर येणाऱ्या नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.