आठवडा पूर्वी कारवाई केलेले अवैध बांधकाम पुन्हा सुरु

वाशी : कोपरी गावातील साईबाबा मंदिर नजिक ‘सिडको'च्या नियोजित रस्त्यात येणाऱ्या अवैध बांधकामावर नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग कार्यालय मार्फत २४ डिसेंबर २०२४ रोजी निष्कासनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, सदर कारवाई  झाल्यानंतर आठवडा होताच भुमाफियांनी निष्कासनाची कारवाई करण्यात आलेले सदर अवैध बांधकाम पुन्हा सुरु केले आहे.त्यामुळे भुमाफियांना नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा धाक राहिला नाही का?, असा प्रश्न कोपरी गावातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोपरी गावातील  नियोजित रस्त्यात येणाऱ्या अवैध बांधकामावर सिडको आणि महापालिकेने मे २०१७ ते डिसेंबर २०२४ दरम्यान तब्बल ५ वेळा निष्कासनाची कारवाई केली आहे. मात्र, ५ वेळा निष्कासनसची कारवाई करुन देखील सदर वादग्रस्त जागेवर पुन्हा एकदा अवैध बांधकाम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. २४ डिसेंबर २०२४ रोजी महापालिकाने सदर अवैध बांधकामावर शेवटची कारवाई केली होती. मात्र, या कारवाईला सहा दिवस उलटताच येथील भूमाफियांकडून पुन्हा एकदा अवैध बांधकाम सुरु करण्यात आले आहे. एखाद्या अवैध बांधकामावर कारवाई केल्यानंतर त्या बांधकाम धारकावर पोलीस ठाणे मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र, सदर ठिकाणावरील बांधकाम धारकावर गुन्हा दाखल करताना तुर्भे विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आधीच विशेष काळजी घेतली आहे. २०२२ मध्ये याच बांधकाम धारकांना अज्ञात व्यक्ती दाखवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता २४ डिसेंबर २०२४ सदर अवैध बांधकामावर कारवाई करुन देखील बांधकाम धारकांवर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याचाच फायदा घेत सदर भमाफियाने  आठवडा भरापूर्वी कारवाई केलेले अवैध बांधकाम पुन्हा जोमात सुरू केले आहे. त्यामुळे सदर भुमाफियाला कोणा वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांचा आशीर्वाद लाभला आहे का?, असा सवाल या निमित्ताने कोपरी गावातील नागरिक उपस्थित करीत आहेत. याबाबत  महाालिका अतिरिक्त आयुक्त आणि उपायुवत (अतिक्रमण)  डॉ. राहुल गेठे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

आठवडा भरापूर्वी कोपरी गावातील साईबाबा मंदिर नजिक निष्कासन कारवाई केलेले अवैध बांधकाम पुन्हा सुरु केले असेल तर त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. - प्रबोधन मवाडे, सहाय्यक आयुक्त - तुर्भे विभाग कार्यालय, नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर डोंगरावर बिबट्याचा वावर